अभिनेत्री झाली राजकारणी! मॅकडोनाल्डमध्ये क्लिनर म्हणून काम केले, आज आहे करोडो संपत्तीची मालक
वडिलांनी दिलेले पैसे आता संपत आले होते. अवघे 200 रुपये शिल्लक राहिले होते. अशावेळी तिने मॅकडोनाल्डमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. हातात झाडू घेतला. दीड महिना ती झाडू काढणे, लादी पुसणे आणि ट्रे साफ करणे असे काम करत राहिली.
नवी दिल्ली | 13 मार्च 2024 : एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला स्वतःला सिद्ध करायचे होते. वडिलांकडून काही पैसे घेऊन ती दिल्लीवरून मुंबईला आली. मुंबईच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली. पण, तिच्या पदरी निराशा आली. ना फेमिना मिस इंडिया होता आले, ना अभिनेत्री बनता आले. वडिलांनी दिलेले पैसे आता संपत आले होते. अवघे 200 रुपये शिल्लक राहिले होते. अशावेळी तिने मॅकडोनाल्डमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. हातात झाडू घेतला. दीड महिना ती झाडू काढणे, लादी पुसणे आणि ट्रे साफ करणे असे काम करत राहिली. अखेर, तिला एक संधी मिळाली आणि ती यशाच्या डोंगरावर पोहोचली…
‘टेलिव्हिजन क्वीन’ म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे स्मृती इराणी. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मधून घराघरातील लोकप्रिय चेहरा बनण्यापूर्वी स्मृती इराणी मुंबईतील वांद्रे येथील मॅकडोनाल्डमध्ये सफाई महिला म्हणून काम करत होत्या. या कामासाठी त्यांना दर महिना 1800 रुपये पगार मिळत होता.
एका मुलाखतीमध्ये स्मृती इराणी यांनी आपल्या भूतकाळाची आठवण करून दिली. पहिली मालिका मला एका ज्योतिषामुळे मिळाली असे त्यांनी सांगितले. एकता कपूर हिच्या ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यासाठी गेले होते. कोणाच्या तरी बहिणीची ती भूमिका ऑफर झाली होती. त्यावेळी एकता हिच्या ऑफिसमध्ये एक ज्योतिषी बसले होते. मला पाहून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तिकडे फिरणाऱ्या त्या मुलीला थांबवा. एकता यांनी विचारले, काय झाले? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही या मुलीसोबत काम केले तर देशात मोठे नाव होणार आहे.’
ज्योतिषाचे ते विधान ऐकून एकता माझ्याकडे आली. मी कोणत्या प्रोजेक्टवर सही केली आहे, असे तिने विचारले. मी भूमिका सांगितल्यावर एकताने तो करार फाडला आणि मला ‘सास भी कभी बहू थी’ची भूमिका ऑफर केली असे स्मृती इराणी यांनी सांगितले. याच भूमिकेमुळे मला घराघरात ओळख मिळाली असेही त्या म्हणल्या.
स्मृती इराणी यांचा भाजपमध्ये प्रवेश
2003 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी 2004 मध्ये काँग्रेसच्या कपिल सिबल यांच्याविरोधात निवडणुक लढवली. तर, 2014 मध्ये त्यांनी अमेठी मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांना आव्हान दिले होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठविण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते देण्यात आले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला आणि पुन्हा मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे महिला व बालविकास मंत्री , वस्त्रोद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये आपली संपत्ती 11 कोटी रुपयांची इतकी दाखविली आहे. यात 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर आणि 3 ते 5 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.