आनंदाची बातमी, सुर्याच्या इतक्याजवळ पोहचले Aditya L1, इस्रो प्रमूखांनी दिली माहीती
भारताच्या चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करून मोजक्याच देशांच्या पंक्तीत भारताला बसविल्यानंतर भारताच्या इस्रो संस्थेने लागलीच दुसरी आदित्य L 1 ही सूर्याचा अभ्यास करणारी मोहीम हाती घेतली होती. आता 125 दिवसांचा प्रवास करुन भारताचे आदित्य यान त्याच्या अंतिम टप्प्यात पोहचल्याची आनंदाची बातमी आली आहे.
तिरुवनंतपुरम | 25 नोव्हेंबर 2023 : भारताने चंद्रयान-3 मधून इतिहास घडविल्यानंतर आता सुर्याच्या दिशेने गेलेल्या अंतराळ यान आदित्य एल-1 बाबत महत्वाची बातमी आली आहे. अंतराळ यान आदित्य एल-1 आपल्या अंतिम टप्प्याच्या जवळ पोहचले आहे. अंतराळातील पृथ्वी आणि सुर्या दरम्यान एल-1 पॉइंटवर आदित्य प्रवेश करण्याची प्रक्रीया 7 जानेवारी 2024 रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आदित्य सूर्याचा अभ्यास करण्याच्या मार्गावर असून आता ते अंतिम टप्प्याच्या जवळ पोहचल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इस्रो प्रमुख सोमनाथ यांनी सांगितले की अंतराळ यान आदित्य एल-1 बिंदूजवळ पोहचण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. एल-1 बिंदूजवळ पोहचण्याची प्रक्रीया शक्यतो 7 जानेवारी 2024 रोजी पूर्ण होईल. आदित्य एल-1 चे उड्डाण 2 डिसेंबर रोजी आंध्रातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीपणे करण्यात आले होते. आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ प्रयोग शाळा आहे. अंतराळ यान आदित्य एल-1 याने तब्बल 125 दिवसाचा प्रवास करीत पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करीत लॅग्रेजियन बिंदू ‘एल-1’ च्या जवळ स्थापित करण्यात येणार आहे.
आदित्य एल- 1 काय करणार ?
एल-1 हा बिंदू सूर्याच्या सर्वात जवळचा बिंदू मानला जातो. सूर्याची रहस्यं जाणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करण्याबरोबरच त्याचे विश्लेषण करुन छायाचित्रे पृथ्वीवर पाठविणार आहे. आदित्य सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. सूर्याच्या प्रकाशमंडळाच्या वरील थराला क्रोमोस्फीयर म्हटले जाते. सूर्याच्या वातावरणाच्या बाहेरील भागाला कोरोना म्हटले जाते. इस्रोच्या मते आदित्य यान क्रोमोस्फीयर आणि कोरोनाच्या गतिशिलतेचा अभ्यास करणार आहे. तेथे असलेल्या कणांचा आणि प्लाझ्माच्या वातावरणाचा, कोरोनाच्या तापमानाचा, कोरोनातील चुंबकीय क्षेत्रातील टोपोलॉजी आणि चुंबकीय क्षेत्राची देखील तपासणी हे यान करणार आहे.
आदित्यला का पाठविले आहे ?
सुर्यावर सौर विस्फोटाच्या घटना कशामुळे होतात आणि क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटींग, अंतराळातील हवामान, अंशतः आयनीकृत प्लाझ्माचे भौतिकशास्त्र, सौर फ्लेअर्स कसे सुरू होतात याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 अंतराळात पाठविण्यात आले आहे. पृ्थ्वीवरील जीवनचक्र सूर्यामुळे सुरु आहे. पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्याचे गुरुत्वाकर्षण संपूर्ण सूर्यमालेला एकत्र धरून ठेवते. सूर्य 4.5 अब्ज वर्ष जुना तारा आहे. सूर्याचा पृष्ठभाग घन नसून तो अत्यंत गरम विद्युत चार्ज झालेल्या वायू प्लाझ्मापासून बनलेला आहे.