मुंबईः ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज एकदिवशीय बिहारचा दौरा करून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीमुळे आगामी निवडणुकांकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी मुंबई महापालिकेत बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश सामना रंगण्याची शक्यता आहे.
कारण, भाजपकडून उत्तर भारतीय मतांसाठी उत्तर प्रदेशातले अनेक नेते प्रचारात आणले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट बिहारच्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्न दिसून येतो आहे.
शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि सत्तातरानंतर आमदार आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच बिहारचा दौरा करुन आले आहेत.
त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांचे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ही राजकीय भेट नसली असं सांगितले असले तरी, या भेटीत तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचं आमंत्रणही देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटही आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना मुंबईत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. कारण सध्या ठाकरे गटही भाजपविरोधात कंबर कसत आहे.
आणि बिहारमध्ये जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दल भाजप विरोधातच असल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे. मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील मिळून साधारण 50 लाख नागरिक राहतात.
त्यापैकी मुंबई महापालिकेत मतदार असणाऱ्यांची संख्या 28 लाखांपर्यंत आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मतांची संख्या 20 लाख, तर बिहारमधील मतदाराची संख्या ही 8 लाखापर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ही सदिच्छा भेट आहे असं सांगितलं जात असले तरी आगामी मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट भाजपविरोधात एकजूट करत असल्याचं बोलले जात आहे.
कारण, याआधी आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसच्या भारत जोडोत सहभाग घेतला होतो तर आता त्यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे.