सज्ञान जोडपे एकत्र राहू शकते, तरुणाचं लग्नाचं वय झालं नसेल तरी नो प्रॉब्लेम : हायकोर्ट
पुरुषाने विवाहयोग्य वय पार केले नाही, म्हणून सज्ञान जोडप्यांचा एकत्र राहण्याचा अधिकार नाकारता येणार नाही, असं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्पष्ट केलं.
चंदिगढ : तरुणाचे लग्नाचे वय झाले नसेल, मात्र तो कायद्याने सज्ञान असेल, तरी त्याला सज्ञान जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने स्पष्ट केलं. भारतात तरुणांना वयाच्या 21 व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी विवाह करण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु हायकोर्टाच्या निर्णयामुळे लग्नाचं वय न गाठलेल्या, मात्र कायद्याने सज्ञान (18 वर्षांवरील) व्यक्तींना लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे. (Adult couple can live together even if man is not yet of marriageable age: HC)
पुरुषाने विवाहयोग्य वय पार केले नाही, म्हणून सज्ञान जोडप्यांचा (adult couple) एकत्र राहण्याचा अधिकार नाकारता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून अॅडल्ट कपल्सना मनाजोगतं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं निरीक्षण जस्टीस अल्का सरीन यांच्या खंडपीठाने नोंदवलं.
“एखाद्या व्यक्तीने तिचं आयुष्य कसं जगावं, हे समाज ठरवू शकत नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य हा जगण्याच्या अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे. या केसमध्ये तरुणी सज्ञान आहे. त्यामुळे तिने कोणासोबत आयुष्य घालवावं, हे ठरवण्याचा अधिकार तिच्या पालकांना नाही. मुलांवर पालकांना आपली मर्जी लादण्याचा अधिकार नाही” असं खंडपीठाने निक्षून सांगितलं.
याचिकाकर्त्या जोडप्याने केलेल्या संरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने फतेहगड साहिबच्या वरिष्ठ एसपींना दिले. संबंधित तरुणी 19 वर्षांची असून तरुण 20 वर्षांचा आहे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरुणीच्या पालकांना त्यांच्या रिलेशनशीपबद्दल समजले, तेव्हा त्यांनी जोरदार विरोध केला.
तरुणीला कुटुंबाने मारहाण केल्याचाही आरोप आहे. मात्र तरुणी स्वतःसाठी काय चांगलं आहे आणि काय नाही, हे ठरवण्यास सक्षम आहे, असं मत कोर्टाने नोंदवलं.
संबंधित बातम्या :
जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका
सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध लग्नाला नकार दिल्याने बलात्कार होत नाहीत : हायकोर्ट
(Adult couple can live together even if man is not yet of marriageable age: HC)