भुवनेश्वर | 10 ऑक्टोबर 2023 : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात कोणीही दावा न केलेल्या 28 मृतदेहांवर अखेर 130 दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही तीन मृतदेहांवर लाकडांद्वारे अंत्यसंस्कार करायला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. उर्वरित मृतदेहांवर येत्या 2-3 दिवसांत अंत्यसंस्कार केले जातील. फ्रोझन कंटेनरमध्ये अखेर आणखी किती दिवस मृतदेह बाळगणार त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे भुवनेश्वर पालिकेच्या आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी म्हटले आहे.
या अपघातातील तीन मृतदेहांवर भुवनेश्वर पालिकेचे अधिकारी, ईस्ट कोस्ट रेल्वे आणि सीबीआयचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज अग्निसंस्कार करण्यात आले. उर्वरित 25 मृतदेह एम्स रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून त्यांना बुधवारी पालिकेच्या हवाली करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. 2 जूनच्या सायंकाळी चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली होती. तिच्या घसरलेल्या डब्यांवरुन दुसऱ्या बाजूने त्याच वेळी हावडा येथे जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेसचे डबे धडकून हा तिहेरी भीषण अपघात घडला होता.
या अपघातात 296 लोक ठार झाल्याने हा तीन दशकातील सर्वात भीषण अपघात मानला जात आहे. या अपघातातील 162 मृतदेह एम्सच्या शवागारात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 81 मृतदेह ओळख पटल्याने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्या. तर उर्वरित 81 मृतदेहांपैकी डीएनए टेस्ट झाल्यानंतर 53 मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. तर 28 मृतदेहांना स्वीकारण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने त्यांना शवागारातच ठेवण्यात आले होते.
बालासोर रेल्वे पोलिसांच्या बराकीत यशवंतपूर एक्सप्रेसच्या दोन जनरल डब्यातील प्रवाशांच्या 147 बॅगांनाही वारसदार मिळालेला नाही. चार महिने या बॅगाही घेण्यास कोणीही पुढे आलेले नाही. या अपघातात रेल्वेच्या सात अधिकाऱ्यांना हलगर्जी आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली सीबीआयने अटक केली आहे.