Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या अटकेनंतर पत्नी सुनीता फ्रंटफूटवर, पोस्ट शेअर करत म्हणाल्या..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेथे त्यांना 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या अटकनेंतर त्यांची पत्नी सुनीता या फ्रंटफूटवर आल्या आहेत.
कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी अटकेची कारवाई झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीच्या अटकेत असलेल्या केजरीवाल यांना शुक्रवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांचची अर्थात 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात फक्त दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशभरात आपतर्फे निदर्शने करण्यात आली. दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिकसह देशाच्या विविध भागात आप कार्यकर्त्यांतर्फे आंदोलन करण्यात आले. या केसमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीचे तीन मोठे नेते तुरुंगात आहेत. यामध्ये मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे.
दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल या फ्रंटफूटवर आल्या आहेत. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता केजरीवाल यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. ‘ तुम्ही तीन वेळा निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना मोदीजींनी सत्तेच्या अहंकारातून अटक करायला लावली. ते सर्वांना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा दिल्लीतील जनतेचा विश्वासघात आहे. तुमचे मुख्यमंत्री नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आत असो वा बाहेर, त्यांचे जीवन देशासाठी समर्पित आहे. जनता जनार्दनला सगळं काही माहीत आहे.’ असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
आपके 3 बार चुने हुए मुख्यमंत्री को मोदीजी ने सत्ता के अहंकार में गिरफ़्तार करवाया।सबको crush करने में लगे हैं। यह दिल्ली के लोगो के साथ धोखा है।आपके मुख्यमंत्री हमेशा आपके साथ खड़े रहें हैं।अंदर रहें या बाहर, उनका जीवन देश को समर्पित है।जनता जनार्दन है सब जानती है।जय हिन्द🙏
— Sunita Kejriwal (@KejriwalSunita) March 22, 2024
कैलाश गेहलोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांची भेट
दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप नेता कैलाश गेहलोत यांनी केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ‘ हे प्रकरण खोटे असून अरविंद केजरीवाल यांना रोखणे हाच एकमेव उद्देश आहे, असे आम्ही सुरुवातीपासून म्हणत आलो आहोत. ईडीने आतापर्यंत काय वसूल केले? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये, अशी पक्षाची भूमिका आहे. मुख्यमंत्री जिथे असतील तिथून सरकार चालवण्यात येईल. आम्हाला यात कोणतीही अडचण नाही. आणि त्यांनी राजीनामा द्यावा, असं कोणताही कायदा सांगत नाही,’ असे त्यांनी नमूद केले.
सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री बनणार ?
एकीकडे केजरीवाल यांची ईडीची कोठडी वाढलेली असतानाच दुसरीकडे आता त्यांची पत्नी, सुनीता या मुख्यमंत्री पद सांभाळू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र याबद्दल पक्षातर्फे अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केजरीवाल हे जेलमधूनच सरकार चालवतील असे अनेत मंत्री आणि नेत्यांचं म्हणणं आहे. केजरीवाल हे 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार असून त्यांची चौकशी करण्यात येईल. याप्रकरणाची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी दुपारी होईल.