केजरीवाल यांच्या अटकेने एकत्र झाली ‘इंडिया आघाडी’, 31 मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅली
केजरीवाल यांची अटक ही लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात असून आता हे स्पष्ट झाले आहे की सत्तेत बसलेला हुकुमशाहा आता एक इंच 'स्पेस' देखील विरोधकांना देण्यासाठी तयार नसल्याचे सीपीआय ( एम ) चे नेते राजीव कुंवर यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे. केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अटकेने आम आदमी पक्षाला तर मोठा फटका बसला आहेच शिवाय विरोधकांच्या इंडिया आघाडीचेही धाबे दणाणले आहेत. लोकसभा निवडणूकीत आप पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभेच्या निवडणूकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात रविवार 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीने महारॅलीचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशातील इंडिया आघाडीचे घटक पक्ष या निदर्शनात सहभागी होणार आहेत. या संदर्भात विरोधी पक्षांनी एका पत्रकार परषदेत या संदर्भात माहीती दिली आहे.
आम आदमी पक्षाचे दिल्ली संयोजक दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत माहीती दिली. केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्ली आणि देशभरात निदर्शने होत आहेत. येत्या दिवसात आणखी निदर्शने होणार आहेत. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव यांच्यावर खोटे खटले टाकण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे विरोधकांना संपविण्याचा घाट असल्याचा आरोप यावेळी गोपाल राय यांनी केला आहे.
ईडी आणि सीबीआयद्वारे धमकविले जात आहे
ईडी आणि सीबीआयच्या मदतीने विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकाविले जात आहे. त्यांनी आपला पक्ष सोडून भाजपात यावे यासाठी हे चालविले आहे. लोकशाही व्यवस्थेची हत्या करुन केजरीवाल यांची अटक झाली आहे. त्यामुळे लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या आणि घटनेवर विश्वास असणाऱ्या नागरिकांच्या मनात संताप आहे. पोलिस विरोधकांविरोधात आरोपींसारखी वागणूक करीत असल्याचे गोपाल राय यांनी म्हटले आहे.
देशातील लोकशाही धोक्यात
भाजपा विरोधकांना निवडणूकांमध्ये विरोधकांना समान संधी देत नाहीए. आजची दडपशाही पाहून रॉलेट एक्टची आठवण यावी. ना अपिल, ना युक्तीवाद, ना वकील अशी परिस्थिती आहे. देशातील लोकशाही संपूर्ण धोक्यात असल्याचे कॉंग्रेस नेते अरविंदर सिंह लव्हली यांनी म्हटले आहे. राहुल गांधी देशातील संविधानिक संस्था वाचविण्यासाठी लढत असून इंडिया आघाडी आपल्या साथीदारासह त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे अरविंदर सिंह लव्हली यांनी म्हटले आहे.
देशातील सर्वात जुन्या पक्षाची बॅंक खाती फ्रिज केली जात आहेत आणि यास लोकशाही म्हटले जात आहे. लोकसभा निवडणूकाच्या तोंडावर लोकांनी निवडलेल्या मुख्यमंत्र्याला उचलून नेले जात आहे, ही अशी लोकशाहीची अवस्था झाली आहे. या दडपशाही विरोधात 31 मार्च रोजी रामलीला मैदानात इंडिया आघाडीची महारॅली होत असून देशाच्या घटनेला आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी या महारॅलीतून देशभर संदेश दिला जाईल असेही अरविंदर सिंह लव्हली यांनी म्हटले आहे.