या लँडींगनंतर अंजू कॅप्टन बनणार होती, नेपाळ विमान दुर्घटनेतील अधूरी कहानी
को-पायलट अंजू खतीवडा यांची कहानी खूपच दुर्दैवी ठरली आहे. या विमानाच्या यशस्वी लँडींगनंतर त्यांचे कॅप्टन होण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. परंतू त्याच्या काही सेंकदाआधी विमानाचा दुर्दैवी अपघात झाला, त्यांच्या पतीचेही विमान अपघातातच निधन झाले होते.
काठमांडू : रविवारी सकाळी घडलेल्या नेपाळच्या विमान दुर्घटनेतील सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात चार क्रू मेंबर्ससह एकूण पाच भारतीयांसह एकूण 72 प्रवासी प्रवास करीत होते. या विमान अपघातातील आतापर्यंत 68 प्रवाशांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत. या विमानातील कोणी बचावले असण्याची शक्यता आता राहीलेली नाही. दरम्यान, या विमानाचे सारथ्य करणाऱ्या एका महिला वैमानिकाची अनोखी कहानी समोर आली आहे.
नेपाळच्या यति एअरलाईनच्या एटीआर – 72 या विमानाच्या पायलट अंजू खतीवडा यांची कहानी समोर आली आहे. या विमानाला चिफ पायलट कमल केसी आणि त्यांची सहाय्यक सह पायलट अंजू खतीवडा हे चालवित होते. विमानाचे चिफ पायलट कमल केसी यांना विमान उड्डाणाचा 35 वर्षांचा अनुभव होता. त्यांनी आपल्या करीयरमध्ये अनेक पायलटना प्रशिक्षण दिले आहे.
या विमानाच्या को- पायलट अंजू खतीवडा यांची कहानी खूपच दुर्दैवी ठरली आहे. या विमानाच्या यशस्वी उड्डाणानंतर लगेच त्यांना को-पायलटनंतर प्रमोशन होत मुख्य पायलट म्हणजेच कॅप्टन म्हणून चार्ज मिळणार होता. ज्यासाठी किमान 100 तासांचा उड्डाणाचा अनुभव आवश्यक आहे. अंजूने यापूर्वी नेपाळच्या जवळपास सर्व विमानतळांवर विमान यशस्वीरित्या उतरवले होते. या विमानाच्या यशस्वी लँडिंगनंतर त्यांना बढती मिळणार होती. त्या को-पायलटपासून कॅप्टन बनणार होत्या. परंतू त्यांचे स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. या विमानाच्या भयानक अपघातात इतर सर्व सह प्रवाशांसह त्यांचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखरा येथे उड्डाण करत असताना ATR-72 विमानातील कॅप्टन कमल केसी यांनी मुख्य पायलटची सीट अंजू खतिवडा यांच्याकडे सोपवली होती असे वृत्त नेपाळी मिडीयाने दिले आहे. पण लँडिंगच्या अवघ्या 10 सेकंद आधी त्याची स्वप्ने आणि आकांक्षा धुळीत मिळाली.
दुर्दैवी योगायोग असा की को पायलट अंजू यांच्या पतीचे निधन देखील विमान अपघातामध्ये झाले होते. त्यांचे पती दीपक पोखरेल देखील यति एअरलाईन्सचे को पायलट होते. 16 वर्षांपूर्वी 21 जून 2006 मध्ये एका विमान दुर्घटनेत अंजू यांच्या पतीचे निधन झाले. नेपालगंज मधून सुर्खेत मार्गे जुम्ला याठिकाणा जाणाऱ्या 9N AEQ या विमानाचा अपघात झाला होता. ज्यामध्ये सहा प्रवाशी आणि चार क्रू सदस्यांचा मृत्यू झाला.