Agnipath Scheme : ‘अग्निवीरां’ना पंख मिळणार! हवाई वाहतूक मंत्रालयाकडून अग्निपथ योजनेतील जवानांसाठी महत्वाची घोषणा
हवाई वाहतूक मंत्रालयाने ट्विटरवरुन करण्यात आलेल्या घोषणेनुसार अग्निवीरांना हवाई वाहतूक सेवा, विमान तंत्रज्ञ सेवा, देखभाल व दुरुस्ती, हवामान आणि हवाई दुर्घटना तपास या विभागात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल.
नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरुन (Agnipath Scheme) देशातील अनेक राज्यात अग्नितांडव सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणासह 12 राज्यात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनं (Violent movement) सुरु आहेत. बिहारमध्ये रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्टेशन पेटवण्यात आलं. अशावेळी केंद्र सरकारकडून या योजनेत महत्वाचे बदल आणि उपाय करण्यात येत आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानेही अग्निवीरांसाठी मोठी आणि महत्वाची घोषणा केलीय. हवाई वाहतूक मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) ट्विटरवरुन करण्यात आलेल्या घोषणेनुसार अग्निवीरांना हवाई वाहतूक सेवा, विमान तंत्रज्ञ सेवा, देखभाल व दुरुस्ती, हवामान, हवाई दुर्घटना तपास या विभागात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासोबतच त्यांना उड्डाण सुरक्षा, प्रशासकीय सेवा, अर्थ, आयटी आणि कम्युनिकेशन कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल. इतकच नाही तर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लॉजिस्टिक, पुरवठा आणि व्यवस्थापन शाखेत संधी दिली जाणार आहे.
Civil Aviation is looking forward to inducting the highly skilled, disciplined and motivated #Agniveers into its various services and give them wings to fly.#AgnipathScheme #Agnipath #Agniveer #BharatKeAgniveer pic.twitter.com/UqRdvjSQ0w
— MoCA_GoI (@MoCA_GoI) June 18, 2022
आतापर्यंत 210 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द
‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात शनिवारी सलग चौथ्या दिवशीही देशाच्या विविध भागात निदर्शने सुरू आहेत. आतापर्यंत 210 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. दोन मेल एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 371 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. बिहारमधील रेल्वेने मोठा निर्णय घेत पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द होऊ शकतात. त्याचवेळी आग्रामध्ये यूपी प्रशासनाने कोचिंग सेंटर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मिर्झापूरमध्ये बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून महत्वाचे उपाय
अग्निपथ योजने अंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या जवानांना राज्य सरकार, खासगी उद्योग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि निमलष्करी दलातील विविध नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिलीय. ‘विविध सरकारी विभागातील नोकऱ्यांमध्ये त्यांना प्राधान्य दिलं जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर अग्निवीरांना दिल्या जाणाऱ्या 11 लाख 71 हजाराच्या आर्थिक पॅकेज व्यतिरिक्त, नवा उद्योग सुरु करण्यासाठी अतिरिक्त संसाधनांची गरज असल्यास सरकार कमी व्याजदरात कर्ज देईल. चार वर्षांनी सेवानिवृत्त झालेल्या अग्निवीरांना रोजगार मिळेल अशी योजना आम्ही आखत आहोत’, असंही सिंह यांनी सांगितलं.
#AGNIPATH योजना चौथ्या वर्षी ₹40,000 प्रति महिना अपग्रेडसह ₹30,000 प्रति महिना आकर्षक मासिक पॅकेज प्रदान करते.
4 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी SEVA NIDHI संमिश्र आर्थिक पॅकेज. pic.twitter.com/qcOwrQAwma
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) June 14, 2022
अग्निपथ योजनेची वैशिष्ट्ये
>> अग्निपथ योजनेच्या भरतीसाठी 17 ते 21 ची वयोमर्यादा आहे
>> इच्छूक उमेदवार 10 वी किंवा 12 वी पास हवा
>> ही भरती चार वर्षांसाठी असेल
>> चार वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होईल
>> भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के जवानांना लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार