Agniveer Recruitment | भारतीय सैन्याची या तारखांना मुंबईत अग्निवीर पदांची भरती
भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी भारतीय तरुणांना मिळणार आहे. भारतीय सैन्यातील अग्निवीर पदाच्या भरतीचा मुंबईत दुसरा टप्पा सुरु होत आहे.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : भारतीय सैन्याच्या अग्निवीर पदांच्या भरतीचा ( Agniveer Recruitment ) दुसरा टप्पा मुंबईत 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कालिना ग्राऊंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अग्निवीर आणि रेग कॅडरसाठी भारतीय सैन्याची भरतीचा दुसरा टप्पा मुंबईत सुरु होणार असून यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये आयोजित ऑनलाइन सीईईच्या छाननी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र ईमेल करण्यात आले आहेत. सेना भरती कार्यालय ( मुंबई ) तर्फे ही भरती मोहीम महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात होणार आहे. यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, धुळे, पालघर, रायगड आणि नंदूरबार या आठ जिल्ह्यांचा समावेश होणार आहे.
अग्निपथ योजना म्हणजे काय ?
केंद्राने गेल्यावर्षी 14 जून रोजी लष्कर, नौसेना आणि वायू सेनेत 17 ते साडे 21 वर्षांच्या तुरुणांसाठी महत्वाकांक्षी अग्निपथ भरती योजना सुरु केली आहे. ही चार वर्षांसाठी शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट आधारीत नोकरी आहे. या योजनेत भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाणार आहे. यांचा रँक सध्याच्या रॅंक पेक्षा वेगळा आहे. त्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. या योजनेद्वारे दर वर्षी 40-45 हजार युवकांना सैन्यात भरती केले जाईल.
शहीदांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत
देशाची सेवा करताना जर अग्निवीराला हौतात्म्य आले तर त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच अग्निवीरांचा उरलेले वेतनही त्यांना देण्यात येईल. जर एखादा अग्निवीर अपंग झाल्यास त्याला मदत म्हणून 44 लाख रुपयांचा निधी आणि उर्वरित वेतन देण्यात येईल. या योजनेला विरोधी पक्षांकडून टीकाही देखील करण्यात आली होती. सैन्यांमध्ये कंत्राटी करणाचा हा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षांनी टीका करताना म्हटले होते.