अल्कोहोल सेवा देण्याबाबत एअर इंडीया ने केला मोठा बदल, प्रवास करण्याआधी जाणून घ्या नियम
गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडीयीमध्ये झालेल्या लघवीच्या घटनेनंतर एअर इंडियाने आता आपल्या मद्य सेवेत मोठा बदल केला आहे.
मुंबई, तुम्हीही जर विमानाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडीयीमध्ये झालेल्या लघवीच्या घटनेनंतर (pee incident) एअर इंडियाने (Air India) आता आपल्या मद्य सेवेत मोठा बदल केला आहे. नवीन धोरणात केबिन क्रूला गरज असेल तेव्हा विचारपूर्वक अल्कोहोल देण्यास सांगण्यात आले आहे. या बदलानंतर विमान प्रवासादरम्यान मद्य सुरक्षितपणे दिली जाईल. प्रवाशांना पुन्हा मद्य देण्यास नकार देण्याबाबत समंजसपणे काम केले जाईल, असे एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले.
परवाना निलंबनाचा आदेश रद्द करण्याबाबत अपील
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणात कर्मचारी संघटनांनी पायलटचे निलंबन रद्द करण्याची विनंती डीजीसीएकडे केली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील सहा कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचाने नागरी उड्डयन महासंचालनालयाकडे (डीजीसीए) एअर इंडियाच्या लघवी प्रकरणात विमानाच्या मुख्य पायलटचा परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली. न्यूयॉर्क-दिल्ली विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याच्या घटनेच्या संदर्भात DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
याशिवाय 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डीजीसीएला पाठवलेल्या पत्रात संयुक्त मंचाने विविध पैलूंचा हवाला देत डीजीसीएला मुख्य वैमानिकाचे निलंबन आणि कडक शिक्षा मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
आवाहन करणाऱ्या संस्थांमध्ये इंडियन पायलट गिल्ड, इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन, एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन, एअर इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन आणि एअरलाइन पायलट असोसिएशन ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. एअर इंडियाने या प्रकरणाची चौकशी बंद केल्याचे सांगितल्यावर संयुक्त मंचाने हे पत्र पाठवले आहे.