अजित पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांसह महायुतीत दाखल झाले. त्यापूर्वी राष्ट्रवादीत भाजपसोबत जाण्यावरुन तीव्र मतभेद झाले होते. त्या नाट्यमय घडामोडी उभ्या देशाने पाहिल्या. त्यानंतर अजित पवार सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी हा निर्णय अचानक अथवा घाई-घाईत घेतला नाही. तर सरकारमध्ये सहकारी होण्यापूर्वी अजितदादा आणि अमित शाह यांच्यात 10 बैठका झाल्याचा खुलासा स्वतः त्यांनी केला. त्यांनी या भेटीसाठी काय पेहराव केला, नाव कसे बदललेल याचा खास किस्सा सांगितला.
निती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी गेल्या वर्षीतील सत्ता नाट्यवेळीची गुपित उलगडली. खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यावेळेचे किस्से सांगितले.
एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील सहकाऱ्यांसह सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठली. नंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यावेळी त्यांनी पण मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना कसं गुपचूप भेटायचो याचा उलगडा केला होता. तर आता अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्यापूर्वीचा किस्सा सांगून सर्वांना आवाक केले.
सत्तानाट्यावेळी 10 बैठका
सत्तानाट्यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात 10 बैठकी झाल्या. दिल्लीत त्यांच्या या बैठका झाल्या. त्यासाठी सामान्य विमानाने ते प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत. त्यांच्या या पेहरावामुळे सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.
अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A. A. Pawar अशा नावाने प्रवास करायचे. याच नावाने बोर्डिंग पास तयार व्हायचा. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास 10 बैठका त्यांनी अमित शाह यांच्यासोबत केल्या. अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना हा खुलासा केला.
जुलै महिन्यात सत्तांतर
2 जुलै 2022 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळात सहभागी झाले. अजित दादा यांना अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. आता विधानसभेसाठी अधिक जागा मिळाव्यात यासाठी अजित दादांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.