रामभक्ताने बनविले जगातील सर्वात मोठे कुलुप, तब्बल 400 किलोग्रॅम वजन, 4 फुटांची चावी
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टसाठी देशभरातून अनेक भक्त विविध स्वरुपाच्या वस्तू भेट देत आहेत. आता एका कारागिराने आगळे - वेगळे कुलुप तयार केले आहे.
लखनऊ | 6 ऑगस्ट 2023 : उत्तरप्रदेशातील महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या अलिगडचे कुलुप जगभरात निर्यात केले जात होते. तर हातापासून कुलुप तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातील एका राम भक्ताने राममंदिरासाठी जगातला सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलुप तयार केले आहे. अनेक महिन्यांपासून त्यांनी हे कुलुप बनविण्यासाठी मेहनत घेतली होती. यावर्षअखेर ते अयोद्धेतील राममंदिरासाठी कुलुप भेट देणार आहेत.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टसाठी देशभरातून अनेक भक्त विविध स्वरुपाच्या वस्तू भेट देत आहेत. आता अलिगडच्या कुलुपांसाठी प्रसिद्ध असलेल्या नगरीतील कुलुपांचे कारागिर सत्य प्रकाश शर्मा यांनी तब्बल 400 किलो वजनाचे कुलुप तयार केले आहे. गेल्या 45 वर्षांपासून कुलुप बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शर्मा यांनी हे अनोखे विश्वविक्रमी कुलुप तयार केले आहे. आधी आम्ही सहा फूट लांबीचे आणि तीन फूट रुंदीचे कुलुप बनविले होते. त्यानंतर लोकांनी मोठ्या आकाराचे कुलुप बनविण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि या कुलुपाला अंतिम स्वरुप आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
दहा फूटांची उंची आणि साडे चार फूट रुंदी
सत्यकुमार यांनी राम मंदिराच्या भव्यतेचा विचार करता हे चार फूटांची चावी असणाऱ्या कुलुपाची निर्मिती केली आहे. हे कुलुप दहा फूट उंच, साडे चार फूट रुंद आणि 9.5 इंच जाडीचे आहे. अलिगड प्रदर्शनात हे कुलुप ठेवण्यात आले आहे. या कामात माझी पत्नी रुक्मीणी हीने देखील मदत केली आहे. त्यामुळे आमच्या प्रेमाच्या कष्टातून ते तयार झाल्याचे सत्यकुमार यांनी सांगितले.
दोन लाखाचा खर्च
हे कुलुप बनविण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. यापूर्वी कोणीच एवढे मोठे कुलुप तयार केले नव्हते. त्यांनी आपली संपूर्ण बचत याकामी लावली. आपण अनेक वर्ष निरनिराळे टाळे आणि कुलुपे बनविली त्याची परतफेड म्हणून राममंदिरासाठी हे आगळे-वेगळे कुलुप तयार केल्याचे ते म्हणतात. राममंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी शुक्रवारी सांगितले की पुढच्या वर्षी 21,22 आणि 23 जानेवारीस राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण दिले आहे.