गेल्या आठ वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत वाढवले; कार्बन उत्सर्जन 27 लाख टनांनी घटले – मोदी
2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण अवघे दोन टक्के इतके होते. मात्र मागील आठ वर्षांमध्ये पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी केंद्र सरकारकडून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासंदर्भात जे वेगवेगळे उपक्रम सुरू आहे त्याची माहिती दिली. भारताने 9 वर्षांत बिगर जीवाश्म इंधनापासून (Fossil fuels) 40 टक्के ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र ते वेळेआधीच पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले. 2014 मध्ये पेट्रोलमध्ये (Petrol)इथेनॉलचे मिश्रण अवघे दोन टक्के इतके होते. मात्र मागील आठ वर्षांमध्ये पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचे देखील मोदींनी म्हटले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्याने कार्बनचे उत्सर्जन सुमारे 27 लाख टनांनी कमी झाले असून, यामुळे सुमारे 41,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाल्यचा दावा देखील मोदींनी केला आहे. पेट्रोलमध्ये इथनॉलचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले.
Today, India has achieved 10% ethanol blending in petrol 5 months ahead of its target: PM Modi at ‘Save Soil Movement’ program pic.twitter.com/UyfWO2MXHj
— ANI (@ANI) June 5, 2022
वनक्षेत्रात वाढ
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘माती वाचवा चळवळी’ची देखील माहिती दिली. यावेळी बोलताना सरकार पर्यावरण सरंक्षणासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे याची त्यांनी माहिती दिली. मोदींनी यावेळी बोलताना सांगितले की, केंद्र सरकार पर्यावरणच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. मग ते पेट्रोलमध्ये इथनॉलचे प्रमाण वाढवणे असो की, बिगर जीवाश्म इंधनापासून 40 टक्के उर्जेचे उदिष्ट साध्य करणे असो असे अनेक उपक्रम केंद्र सरकारने राबवले आहेत. याचाच परिणाम म्हणून मागील आठ वर्षांमध्ये भारताचे वनक्षेत्र 20000 चौरस किलोमीटरने वाढले असून, वन्यजीवांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे.
काय आहे माती वाचवा चळवळ
सध्या रासायनिक खतांच्या अतेरिकी वापरामुळे मातीचा पोत बिघडला आहे. उत्पादन क्षमतेमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. मातीचे आरोग्य बिघडवण्यास जे घटक कारणीभूत आहेत, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. मार्चमध्ये सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी ही चळवळ सुरू केल आहे. हा एक जागतिक उपक्रम आहे. ज्यामध्ये विविध देशांमध्ये फिरून जनजागृती करण्यात येणार आहे.