Video | वंदेभारत पकडताना पडला प्रवासी, देवदूत बनून धावला आरपीएफचा जवान
रेल्वे मंत्रालयातर्फे वारंवार सूचना देऊनही प्रवासी त्यातून काही धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे. वंदेभारत सुटल्यानंतरही तिला पकडण्याच्या एक प्रवासी घसरून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कोलकाता | 12 ऑक्टोबर 2023 : रेल्वे प्रशासन धावती ट्रेन पकडू नये असे प्रवाशांना वारंवार आवाहन करीत असते. चालती गाडी पकडणे जीवावर बेतू शकते. आपण रेल्वे सुटण्याच्या दहा – पंधरा मिनिटे आधी फलाटावर पोहचणे गरजेचे असते. तरीही प्रवासी निष्काळजीपणा करतात आणि धावती ट्रेन पकडण्याची चूक करतात. अशाच एक धोकादायक प्रसंग हावडा रेल्वे स्थानकात घडला आहे. येथे वंदेभारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर तिला पकडण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाचे प्राण केवळ पोलीसाच्या प्रसंगावधानाने बचावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हावडा रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. मंगळवारी हावडा स्थानकात वंदेभारत सुटल्यानंतर तिला पकडण्याचा प्रयत्न एक प्रवासी करीत होता. त्याने पळत जाऊन गार्डच्या केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा तोल गेल्याने तो ट्रेन आणि फलाटाच्या गॅपमध्ये जाण्याच्या बेतात असतानाच त्यावेळी ड्यूटीवरील आरपीएफ जवानाने धावत जाऊन त्याला ओढून बाहेर काढले त्यामुळे थोडक्यात त्याचे प्राण बचावल्याचे उघडकीस आले आहे. जर जवानाला काही सेंकद उशीर झाला असता तर या प्रवाशा्ला वाचविणे कठीण गेले असते. या जवानाच्या प्रसंगावधानाचे कौतूक होत आहे.
हा पहा व्हिडीओ –
RPF personnel appears as a saviour to a passenger at Howrah station today. pic.twitter.com/WWtwD1wTda
— Abir Ghoshal (@abirghoshal) October 10, 2023
वंदेभारत एक्सप्रेस ही आधुनिक ट्रेन असल्याने तिचे दरवाजे स्वयंचलित उघड आणि बंद होतात. त्यामुळे वेळेत या ट्रेनमध्ये चढावे लागते. या पूर्वी तेलंगणाच्या बेगमपेट रेल्वे स्थानकात एका महिलेचा असाच ट्रेन पकडताना अपघात होता होता ती वाचली. एका कॉन्स्टेबलने धावत येऊन तिचे प्राण वाचविले होते. तसेच मार्च महिन्यात वांद्रे टर्मिनसवर एका व्यक्तीने चालती ट्रेन पकडताना त्याचा तोल गेल्याने तो फलाट आणि ट्रेनच्या गॅपमध्ये घसटत आत जाणार इतक्या जवानाने त्याचे प्राण वाचविले. रेल्वे मंत्रालयातर्फे वारंवार सूचना देऊनही प्रवासी त्यातून काही धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे.