दुचाकी पार्किंग करण्यासाठी आनंद महिंद्रांचा नवा फंडा, लोकांकडूनही कौतुक
देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी एक नवी क्लुप्ती सुचवलीय. याबाबत त्यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन या भारतीय जुगाड पद्धतीचं एक चांगलं उदाहरण सांगितलं.

मुंबई : तुमच्या घरी बाईक किंवा स्कुटर पार्किंगसाठी जागा नसेल किंवा तुमच्या गाडीला उन, वारा, पाऊस यापासून वाचवायचं असंल, तर हा फंडा तुमच्यासाठीच आहे. देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनी यासाठी एक नवी क्लुप्ती सुचवलीय. याबाबत त्यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन या भारतीय जुगाड पद्धतीचं एक चांगलं उदाहरण सांगितलं.
प्लास्टिक पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे सांगत पर्यावरणवाद्यांकडून अनेक वर्षांपासून यावर बंदीची मागणी होतेय. आता हा धोका प्रचंड वाढला असून यामुळं अनेक जीवांना धोका निर्माण झालाय. अगदी समुद्री जीवांचंही जीवनचक्र यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होतंय. सरकारसोबतच देशातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि कंपनी प्लास्टिकच्या पुनर्वापरावर भर देत आहे. तसंच याबाबत जनजागरुती करत आहेत.
महिंद्रा समुह हा देखील यापैकीच एक आहे. महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी नुकताच आपल्या ऑफिसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदीचा निर्णय घेतला. त्याबरोबरच त्यांनी आहे त्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यावरही भर दिला आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी ट्विटरवर प्लास्टिकच्या टाकीचा पार्किंगसाठी उपयोग होत असल्याचं उदाहरण नमूद केलं. तसंच इतरांनीही असा उपयोग करण्याचं आवाहन केलं.
I had tweeted about banning plastic water bottles in my office & I suppose that could apply to a number plastic products around us. But good to see people creatively recycling stuff as well! pic.twitter.com/T0780KLUrI
— anand mahindra (@anandmahindra) July 18, 2019
महिंद्रा यांच्या या नव्या आवाहनाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात गाडी बाहेर उभी केल्यास अनेकदा गाडीला गंज लागणं किंवा तिचे इलेक्ट्रॉनिक भाग खराब होण्याचं प्रमाण वाढतं. त्यावर महिंद्रा यांनी सुचवलेला उपाय चांगलाच परिणामकारक आहे. महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “मी माझ्या ऑफिसमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातली. मला आशा आहे की आजूबाजूच्या अनेक प्लास्टिक उत्पादनांनाही हे लागू होईल. मात्र, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी लोक असे भन्नाट प्रयोग करत आहे हे पाहून छान वाटत आहे.”
महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोत घराच्या समोरील जागेत एक पाण्याची प्लास्टिकची खराब झालेली टाकी आहे. तिचा उपयोग बाईक आणि स्कुटी या दुचाकी पार्किंगसाठी करण्यात आला आहे. कुणीतरी गाडीचं उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून उपयोग केला होता. महिंद्रा यांच्या या ट्विटची काही लोकांनी चेष्टाही केली आहे. मात्र, अनेक लोकांनी प्लास्टिकच्या पुनर्वापराचा निर्णय घेत आपल्याकडील अशा उदाहरणांचे फोटो पोस्ट केले.