कामावरून परतणाऱ्या महिलांच्या रिक्षाला बसची धडक; 7 महिला जागीच ठार

| Updated on: May 15, 2023 | 1:07 AM

रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि समोरून येणारी बस आणि रिक्षा या दोघांचेही नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कामावरून परतणाऱ्या महिलांच्या रिक्षाला बसची धडक; 7 महिला जागीच ठार
Follow us on

अमरावती: आंध्र प्रदेशात ऑटोरिक्षा आणि बसचा समोरासमोर भीषण अपघात होऊन 7 महिला जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातामुळे तल्लारेवू बायपासवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ऑटोरिक्षा आणि बसच्या झालेल्या अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सर्व महिला ऑटोरिक्षातून प्रवास करत असताना बसला समोरासमोर धडक बसली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. काकीनाडा जिल्ह्यात हा अपघात झाला असून जखमींना जवळच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील तल्लारेवू बायपासजवळ हा अपघात झाला आहे. या सर्व महिला जवळच असलेल्या एका कोळंबी फार्मिंग फर्ममध्ये काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑटोरिक्षात या महिलांशिवाय इतर लोकही बसले होते. त्यापैकी 6 जण गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

जखमींना तातडीने काकीनाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघातानंतर जखमी व मृतांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर मृतांचे नातेवाईकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती.

रिक्षा प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि समोरून येणारी बस आणि रिक्षा या दोघांचेही नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींची सुटका करून त्यांना तातडीने काकीनाडा येथे उपचारासाठी पाठवले. याप्रकरणी कोरंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू करण्यात आला आहे. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.