अंजूची चार दिन की चांदनी संपली, अचानक येऊ लागली भारताची आठवण
एकीकडे सीमा हैदर पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नोएडाच्या सचिन मीना याला भेटायला आली. तर दुसरीकडे अंजू आपला संसार सोडून पाकिस्तानातील नसरुल्ला या प्रियकराला भेटायला गेली आहे
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : राजस्थानातील अलवर येथून आपला संसार आणि मुलाबाळांना सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू हीला आता आपल्या मायदेशाची आठवण येत आहे. आपण इकडे खूप दु:खी आहोत. दिवस रात्र आपल्याला मुलांची आठवण येत आहे. माझ्यामुळे पालकांची खूपच बदनामी झाली आहे. याला मीच जबाबदार आहे. आपल्याला भारतात येऊन सर्व परिस्थितीला सामोरे जायचे असल्याचे अंजू हीने म्हटले आहे.
एकीकडे सीमा हैदर पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नोएडाच्या सचिन मीना याला भेटायला आली. तर दुसरीकडे अंजू आपल्या पाकिस्तानातील नसरुल्ला या प्रियकराला भेटायला आपल्या मुलांना सोडून गेली आहे. तिकडे अंजूचे स्वागत करण्यात आले असून त्यांना मोठे घर आणि नोकरी तसेच महागडी गिफ्ट देण्यात आली आहेत. अंजू तिकडे जाऊन फातिमा झाल्याने तिच्या आई-वडीलांनी खूपच टीका केली होती.
कोणी जबरदस्ती केलेली नाही
अंजूने म्हटले आहे की पाकिस्तानात येण्याचा माझा स्वत:चा निर्णय होता. परंतू येथे आल्यानंतर हे प्रकरण इतके वाढेल असे वाटले नव्हते. त्या प्रेशरमुळे मी परत भारतात येऊ शकली नाही. परंतू सर्वकाही नॉर्मल झाल्यावर मला भारतात माझ्या मुलांना भेटायला जायचे आहे. त्यांना मी दिवसरात्र मिस करीत आहे. त्यामुळे यासाठीच मी खूपच दु:खी आहे. आपण आधीही मुलांना एकटे सोडले आहे असे अंजूने म्हटले आहे. अंजूने म्हटले आहे की आपण भारतात परत जाण्यास तयार आहे. मला सर्वांना सामोरे जायचे आहे. मी लोकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे, तेथे जाऊन मी सर्वांना सांगणार आहे की माझ्या मर्जीने येथे आले आहे. कोणी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाही. येथे मला खूप चांगले ठेवले असल्याचेही तिने म्हटले आहे.
अंजू हीच्या व्हिसाची मुदत संपायला आली
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या व्हीसात वाढ केल्याचे म्हटले जात आहे. परंतू बीबीसीने दिलेल्या बातमीत व्हीसाची मुदत वाढविण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. नसरुल्लाने म्हटले आहे की व्हीसाची मुदत वाढविण्यासाठी अर्ज केला होता. परंतू त्यावर काही निर्णय झालेला नाही. या प्रक्रीयेसाठी 10-15 दिवस लागू शकतात असे त्याने स्पष्ट केले आहे. आता व्हिसाची मुदत वाढवायची की नाही हे आता त्यांच्या हातात आहे. तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडे असे कोणतेही दस्ताऐवज आलेले नसल्याचे म्हटले आहे. अंजू हीच्या व्हिसाची मुदत येत्या 21 ऑगस्टपर्यंतच आहे.