देशाच्या विरोधकांचा लागोपाट गेम, पाकिस्तानात अतिरेक्यांमध्ये घबराट
परकीय भूमीवर भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या लागोपाठ हत्या झाल्याने पाकिस्तानसह अन्य देशातील दहशतवादी टेन्शनमध्ये आले आहेत.
नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : पठाणकोट येथील भारतीय वायू दलाच्या तळावर 2 जानेवारी 2016 रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार शाहिद लतीफ याची पाकिस्तानात हत्या झाल्यानंतर पाकिस्तानी अतिरेकी दहशतीत आहेत. भारताविरोधात अतिरेकी कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांच्या परदेशात एकामागोमाग हत्या होत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत अलिकडच्या काळात परकीय भूमीवर एक डझनाहून अधिक भारत विरोधी अतिरेक्यांच्या खात्मा झाल्याने त्यांच्यात दहशत पसरली आहे.
भारतासाठी हवा असलेल्या पठाणकोट हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ‘जैश-ए-मोहम्मद’चा अतिरेकी शाहिद लतीफ आणि त्याच्या भावाची बुधवारी पाकिस्तानच्या सियालकोट भागातील एका मशिदीबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. याशिवाय एक डझन अतिरेकी अलिकडच्या दिवसात ठार झाले आहेत. काही हत्या संशयास्पद आहेत. तर काहींच्या हत्येबद्दल दुजोरा मिळाला नाही.
खलीस्थानी चळवळीचा समर्थक हरदीप सिंह निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येनंतर भारतीय तपास यंत्रणांवर खोटे आरोप करण्यात आले होते. परंतू भारताने ते साफ फेटाळून लावले. अतिरेक्यांसाठी अश्रू ढाळणाऱ्यांच्या दबावाखाली न येता भारताने अतिरेक्यांवर कठोर पावले उचलण्याची मागणी संबंधीत देशांकडे लावून धरली आहे. शाहिद लतीफ पठाणकोट हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर होता. त्याच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत ( यूएपीए ) तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला दहशतवादी घोषित केले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या गुजरांवाला परीसरात राहणारा शाहिद जैश-ए-मोहम्मदचा सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. त्याची हत्या कोणी आणि का केली हे अजून समोर आलेले नाही.
आतापर्यंत 16 जणांच्या हत्या ?
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या कराचीत लष्कर- ए- तैयबाचा अतिरेकी कैसर फारुक याची हत्या झाल्याची बातमी आली होती. तसेच लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा मुलगा कमालुद्दीन याच्याही अपहरणातून मृत्यूची बातमी आली होती. परंतू त्यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपची हत्या झाल्यानंतर खलिस्तानी संघटनेत घबराट पसरली आहे. परदेशात आता 16 जणांच्या कथित हत्या झाल्या आहेत. यातील सर्वाधिक पाकिस्तान आणि कॅनडात झाल्या आहेत.