कोण आहेत महाराष्ट्र कन्या क्षमा सावंत? जातभेदाविरोधात यशस्वी लढाई, हा कायदा मंजूर करणारं यांचं पहिलंच शहर!
जातभेद विरोधी कायदा मंजूर झालेलं सिएटल हे अमेरिकेतलं पहिलं शहर आहे. त्यामुळे क्षमा सावंत या महाराष्ट्र कन्येचं नाव जगभरात कौतुकानं घेतलं जातंय.
मुंबईः भारतात जातीभेदावर आधारीत वर्तणुकीविरोधात १९४८ मध्येच बंदी घालण्यात आली होती. देशाच्या राज्यघटनेतही या महत्त्वाच्या तत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अत्यंत विकसित राष्ट्र असलेल्या अमेरिकेतल्या पहिल्या शहरात नुकताच जातभेदविरोधी कायदा संमत करण्यात आलाय. विशेष म्हणजे या कायद्याच्या मंजुरीसाठी झटणाऱ्या महिला आहेत, क्षमा सावंत (Kshama Sawant). महाराष्ट्र (Maharashtra) कन्या. अमेरिकेतील सिएटल या शहरात जातभेद विरोधात कायदा मंजूर करून घेण्यात त्यांना यश आलंय. असा कायदा मंजूर झालेलं सिएटल हे अमेरिकेतलं पहिलं शहर आहे. त्यामुळे क्षमा सावंत या महाराष्ट्र कन्येचं नाव जगभरात कौतुकानं घेतलं जातंय.
मंगळवारी विधेयक पारीत
अमेरिकेतील सिएटल शहरात क्षमा सावंत या सिटी कौंसिलच्या सदस्या आहेत. शहरातील जात-भेदावर बंदी घालण्यासाठी त्यांनी एक प्रस्ताव आणला. यावर मंगळवारी मतदान झालं आणि तो ६०१ अशा फरकाने मंजूर झाला. या परिसरातील भारतीय आणि हिंदू समुदायासाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय मानला जातोय.
मागील तीन वर्षात अमेरिकेतील दहा हिंदू मंदिरांवर आणि पाच पुतळ्यांवर हल्ले झाले आहेत. यात महात्मा गांधी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळल्यालाही हानी करण्यात आली. अमेरिकेतील हिंदू धर्मियांसाठी या घटना अपमानास्पद तसेच दहशत माजवणाऱ्या असल्याचं अनेकांचं मत आहे. अमेरिकेत भारत वंशियांची संख्या जास्त आहे.
दक्षिण आशियायी समुदायात मतभेद
सिएटल शहरात मंजूर झालेल्या या विधेयकाला दक्षिण आशियाई समुदायाला फायदा होणार असल्याचं एकिकडे म्हटलं जातंय. मात्र या समुदायातही काही मतभेद आहेत. या समाजातील नागरिक कमी असले तरीही एक प्रभावशाली गट म्हणून या समाजाकडे पाहिलं जातं. दक्षिण आशियातील लोकांना, भारतीय अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्याचा उद्देश या विधेयकाचा असल्याचा आरोप केला जातोय. कारण हे धोरण प्रभावी झाल्यास अमेरिकेत हिंदूफोबिया वाढू शकतो, असं तेथील भारतवंशीय अमेरिकी नागरिकांचं मत आहे.
क्षमा सावंत महाराष्ट्र कन्या
क्षमा सावंत या पुण्यात जन्मल्या असून त्यांचं शिक्षण मुंबईत झालं आहे. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. क्षमा सावंत या उच्चवर्णीय आहेत. त्या म्हणतात, दक्षिण आशिया भागात दलितांविरोधात जो भेदभाव होतो, तसा इथे दिसत नाही. मात्र अमेरिकेत भेदभाव होतो, हे वास्तव आहे. ते समजून घेण्याची जास्त गरज आहे. अमेरिकेतील शाळांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी जातीभेद होतो, हे सर्वज्ञात आहे. तरीही यावर फारसं बोललं जात नसल्याचं क्षमा सावंत सांगतात.
अमेरिकेत सध्या या कायद्यावर प्रचंड चर्चा सुरु आहे. मत-भेद मांडले जात आहेत. तर जातभेदाविरुद्ध प्रस्ताव सादर करणाऱ्या क्षमा सावंत त्यांच्या लढ्याला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.