आर्मीचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवानांचा मृत्यू, उत्तर सिक्कीम हादरले
पंतप्रधान मोदी यांनी मृतक जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना ५०-५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.
गंगाटोक : सिक्कीमच्या जेमा येथे शुक्रवारी आर्मीचा ट्रक दरीत कोसळला. यात १६ जवानांचा मृत्यू झालाय. एक वाहन नागमोड वळणं असलेल्या ठिकाणी घसरले. त्यानंतर वाहन दरीत जाऊन कोसळले. या वाहनासोबतच आणखी आर्मीच्या दोन व्हॅन होत्या. तिन्ही वाहनं सकाळी चटन येथून थंगूसाठी निघाले होते. जवानांच्या रिसक्यू टीमनं ४ जखमी जवानांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल केले.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलं. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी मनोकामना केली. पंतप्रधान मोदी यांनी मृतक जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान साहाय्यता निधीतून दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना ५०-५० हजार रुपये देण्याची घोषणा केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. उत्तर सिक्कीममध्ये रस्ता दुर्घटनेत भारतीय जवानांचा अपघाती मृ्त्यू झाला. देश त्यांची सेवा आणि समर्पणाबद्दल कृतज्ञ राहील, असं त्यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हंटलं आहे.
उत्तर सिक्कीममध्ये यापूर्वी २२ नोव्हेंबरला स्पेशल फोर्स युनिटचे असिस्टंट लीडर लघ्याल यांचा मृ्त्यू झाला. घटनेच्या वेळी ते भारत-चीन सरहद्दीवर सराव करत होते. आठ वर्षांपासून ते विकास रेजिमेंटशी जुळलेले होते.
२४ जूनला सिक्कीम स्काऊटसचे दोन जवान जुलुक रस्ता दुर्घटनेत ठार झाले. मनोज छेत्री आणि सोम बहाद्दूर सिब्बा यांचा मृत्यू झाला. दोन्ही जवान जुलुकमध्ये काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जात होते. अंधूक रस्त्यानं जात असताना ३०० फूट दरीत कोसळले. २१ ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशच्या सिय्यांग जिल्ह्यात सेनेचा रुद्र हेलिकॅप्ट क्रॅश होऊन पाच जण ठार झाले.