Rain : देर आए दुरुस्त आए, राज्यात पावसाची दमदार एन्ट्री, कोणत्या जिल्ह्यातील बळीराजा सुखावला? वाचा सविस्तर
राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. ही सुरवात असून जोपर्यंत 75 ते 100 मिमी पावसाची नोंद होत नाही आणि शेतजमिनीत ओलावा राहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ अर्थात पेरणी करुन नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्याही घटना घडलेल्या आहेत.
मुंबई : राज्यात (Monsoon) मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची उत्सुकता केवळ शेतकऱ्यालाच नाहीतर सर्वसामान्य नागरिकांनाही लागली होती. शिवाय (Meteorological Department) हवामान विभागाने यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले होते. पण पाऊस लांबणीवर पडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कारण या मान्सूनवरच शेतकऱ्यांच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचा असणार (Kharif Season) खरीप हंगाम अवलंबून आहे. मान्सूनने ताणून धरले पण तुटू दिले नाही. मृगातले मुहूर्त साधत दोन दिवसांपूर्वी कोकणातून दाखल झालेला पाऊस आता राज्य व्यापत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. ही सुरवात असून जोपर्यंत 75 ते 100 मिमी पावसाची नोंद होत नाही आणि शेतजमिनीत ओलावा राहत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ अर्थात पेरणी करुन नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्याही घटना घडलेल्या आहेत.
- पालघरमध्ये रिमझिम, उकाड्यापासून दिलासा जिल्ह्यातील वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात शनिवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. शिवाय काल दुपारपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने हावेत पूर्ण गारवा पसरला आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून या पावसाने शहरातील सकल भागामध्ये पाणी साचले आहे. रविवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे.
- गोंदियात विजेच्या कडकडाटासह बरसला, पेरणीसाठी जरा थांबा गोंदिया जिल्ह्यातही शनिवारी रात्री उशीरा विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. दुपारनंतरच वातावरणात बदल झाला होता. पण रात्री 11 वा. पासून पावसाला सुरवात झाली. पावसाने सुरवात केली असली तरी हा पाऊस पेरणी योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाल्यावरच खरिपातील पेरणीला सुरवात करावी लागणार आहे.
- आंबेगावात मान्सूनपूर्व पावसातच शेत शिवारात पाणी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्यात शेतीचे बांध फुटून गेले आहेत शेतात असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. पण खरिपासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने शेतकरी समाधानी आहे.
- जालन्यात मात्र नुकसानीच्या सरी मान्सूनचा पाऊस हा अनियमित आणि अनिश्चित अशा स्वरुपाचा असतो. याचा प्रत्यय जालन्यात आला आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून एक महिला दगावल्याची घटना भोकरदन तालुक्यातील कोदा येथे घडली. कोदा येथील महिला शेतकरी गंगाबाई पांडूरंग जाधव, मुलगा दत्ता पांडूरंग जाधव, भारती गजानन जाधव हे तिघे शेतातील छपरावर पटी टाकत असता दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वीज पडल्याने गंगाबाई पांडुरंग जाधव वय (55) ही जागीच ठार झाली असून दत्तात्रय जाधव व भारती जाधव हे जखमी झाले असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेस खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
- अंबड तालुक्यात पावसाने साधले मुहूर्त जालना जिल्ह्यात शनिवारी काही तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. उशीरा का होईना पण मृगात पाऊस झाल्याने आता पेरणीयोग्य वातावरण निर्माण झाले आहे. वडीगोद्री सह शहागड,महाकाळा परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले.मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अकोल्यात जोरदार पाऊस, खताची पोतेही भिजले विर्दभातील अनेक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्हातल्या शिवापूर रेल्वे स्टेशनवर असलेल्या माल धक्यावर जोरदार आलेल्या पावसामुळे सिमेंट आणि खताची पोते भिजली असून यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- नाशिकात बी-बियाणे खरेदीची लगबग, कांद्याचा मात्र वांदाच मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातील कांदा व्यापाऱ्यांचे कांदा गोडाऊन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाऱ्यामुळे संपूर्ण चांदवड तालुक्यातील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. या वादळामुळे वीज वितरण कंपनीचे विजेचे खांब उन्मळून पडले होते. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी बियाणे घेण्यासाठी लगबग सुरू झाली असून पेरणी लायक पाऊस पडला. तर सुरगाणा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. तर वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी समाज वर्गाकडून केली जात आहे.