Nitish Kumar | आता काय म्हणावे सांगा! नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठवणीने गहिवरले
Nitish Kumar | राजकारणात कोणीच कायमचा मित्र आणि शत्रू नसतो म्हणतात. त्यात अनेकदा भांडून पुन्हा घरोबा करणाऱ्या नितीश कुमार यांना भाजपची आठवण येणे सहाजिकच होते. इंडिया अलायन्स घडवण्यात त्यांचा मोठा हात होता. पण त्यांनाच कोपऱ्यात लोटण्यात आले. आता दुखाचा डोंगर घेऊन नितीश कुमार पुन्हा भाजपकडे जाण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे फिर वही दिल लाया हूँ, हा प्रयोग सुरु झाला आहे. भाजपसोबत बिहारमध्ये संसार थाटल्यानंतर नितीश कुमार यांचे मन भरले. त्यांनी भरल्या संसारात माती कालवली आणि युतीमधून बाहेर पडले. भाजपला शह देण्यासाठी त्यांच्याच सुपीक डोक्यातून देशातील सर्व पक्षांची एक फळी तयारी करण्याची आयडिया समोर आली. त्यांनी पुढाकार घेत त्याला मूर्त रुप दिले. इंडिया आघाडी नावारुपाला आली. पण नितीश कुमार यांनाच दुर्लक्षित करण्यात आले. आता बिहारी बाबूला पुन्हा एकदा भाजपचा आठवण झाली आहे. त्यांना उमाळा फुटला आहे.
काय दिले संकेत
बिहारचे मुख्यमुंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या नेत्यांसोबतच्या मैत्रीची आठवण झाली. मोतिहारीमध्ये महात्मा गांधी सेंट्रल युनिर्व्हसिटीच्या दीक्षांत समारोहात त्याचे संकेत त्यांनी दिले. जोपर्यत जिवंत आहे, तोपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री कायम असेल, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मंचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व इतर भाजप नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली.
काय केली टीका
बिहारमध्ये केंद्रीय विश्वविद्यालयाची त्यांनी मागणी केली. पण तत्कालीन मनमोहनसिंग यांच्या सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. 2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वात ज्यावेळी केंद्रात सरकार आले. त्यांनी तात्काळ त्यांची मागणी पूर्ण केली. युपीए सरकारच्या कार्यकाळात, 2007 मध्ये देशात मध्यवर्ती विद्यापीठ उघडण्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये मनमोहनसिंग यांच्या सरकारने केंद्रीय विश्वविद्यालय अधिनियम मंजूर केले. बिहारमध्ये नवीन विद्यापीठ स्थापन्याचे पक्के झाले. पण त्याला मुहूर्त काही लागला नाही. तो मुहूर्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लागला. मोतिहारी येथे केंद्रीय विद्यापीठाच्या कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारच्या राजकारणात भूकंप?
नितीश कुमार हे प्रयोगशील समाजवादी म्हणून ओळखले जातात. प्रत्येक पक्षासोबत त्यांनी सत्तेचा प्रयोग केला आहे. भाजपसोबत त्यांचे भिनसले आणि पुन्हा पॅचअप झाले आहे. यावेळी पण तसेच झाले. त्यांनी भाजपची साथ सोडून युपीए आघाडीच्या नवीन चेहऱ्याला आकार दिला. इंडिया आघाडीचा प्रयोग त्यांच्या मुशीतून बाहेर आला. पण त्यात त्यांच्या हाती काही लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना इंडिया आघाडीत साईड लाईन करण्यात आल्याने ते सध्या दुखावलेले आहेत. त्यात त्यांनी भाजपसोबतचे घट्ट संबंधांची आठवण काढल्याने, नितीशबाबू कोणती वीण घट्ट करत आहेत, याकडे बिहारसह देशाचे लक्ष लागले आहे.