Bogus Universities : देशात तब्बल 21 विद्यापीठे बोगस, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश; यूजीसीने जाहीर केली यादी
देशातील बोगस विद्यापीठांच्या यादीत राजधानी दिल्ली आघाडीवर असल्याची आकडेवारी आहे. यूजीसीच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये एकूण 8 बोगस विद्यापीठे आहेत.
नवी दिल्ली : देशाच्या शिक्षण क्षेत्रातही कमालीची बनावटगिरी सुरु असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. देशभरात तब्बल 21 विद्यापीठे बोगस (Bogus) असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठा (Raja Arebic University)चा समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बोगस विद्यापीठांची यादी (List) जाहीर केली आहे. त्या यादीनुसार सर्वात जास्त बोगस विद्यापीठांची संख्या राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमध्ये आठ, उत्तर प्रदेशमध्ये चार तर महाराष्ट्रात एक विद्यापीठ बोगस असल्याचा दावा यूजीसीच्या अहवालात करण्यात आला आहे. ही विद्यापीठे स्वत:ला मान्यताप्राप्त विद्यापीठ असल्याचा दिखावा करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली आहे. या माध्यमातून त्यांनी यूजीसीचे नियम आणि निकषांचे सरळसरळ उल्लंघन केले आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यूजीसीच्या या यादीमुळे देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राजधानी दिल्लीतील सर्वाधिक आठ बोगस विद्यापीठे
देशातील बोगस विद्यापीठांच्या यादीत राजधानी दिल्ली आघाडीवर असल्याची आकडेवारी आहे. यूजीसीच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीमध्ये एकूण 8 बोगस विद्यापीठे आहेत. त्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड दर्यागंज, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-केंद्रित न्यायिक विद्यापीठ, भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकी संस्था, विश्वकर्मा खुले स्वयंरोजगार विद्यापीठ, आध्यात्मिक विद्यापीठ यांचा समावेश आहे. दिल्लीत बोगस विद्यापीठ स्थापन करणाऱ्या लोकांच्या धाडसाने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मोठा धक्का दिला आहे.
बोगस विद्यापीठांच्या यादीत उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक
बोगस विद्यापीठांच्या यादीत दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेशने दुसरा क्रमांक लावला आहे. उत्तर प्रदेशात 4 बोगस विद्यापीठे आहेत. त्यात गांधी हिंदी विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), भारतीय शिक्षा परिषद या बोगस विद्यापीठांचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या बोगस विद्यापीठांची नावेही यूजीसीने जाहीर केली आहेत. या बोगस विद्यापीठांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. ही विद्यापीठे सतत यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांना बोगस विद्यापीठे म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे यूजीसीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राशेजारील कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील भडगावी सरकार मुक्त विद्यापीठ बोगस असल्याचे यूजीसीने जाहीर केले आहे. (As many as 21 universities in the country are bogus, including one in Maharashtra)