नवी दिल्ली : असानी चक्रीवादळाचा (Asani Cyclone) तडाखा आता आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू राज्यांना बसताना पाहायला मिळत आहे. या राज्यात सकाळपासूनच जोरदार वारे वाहत आहेत. तसंच पावसालाही सुरुवात झाली आहे. असानी चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा सरकार (Odisha Government) हाय अलर्टवर आहेत. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलिसांनी आदेश दिल्यानंतरही ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात काही मच्छिमार समुद्रात मासेमारीसाठी उतरले होते. मात्र, इशारा दिल्यानंतर मच्छिमार (Fisherman) जेव्हा माघारी फिरले, तेव्हा सर्व 6 बोटी बुडाल्या. 6 बोटीद्वारे जवळपास 60 मच्छिमार किनाऱ्यावर येत होते. त्याचवेळी उंच लाटांमुळे त्यांच्या बोटी बुडाल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.
आर्यपल्ली समुद्रात देव्हा सनर्यपल्ली, बडा आर्यपल्ली आणि गोलाबंध परिसरात मच्छिमार मासेमारी करुन परत होते तेव्हा ही दुर्घटना घडली. दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बोटी पलटल्यानंतर सर्व मच्छिमार सुखरुपपणे किनाऱ्यावर पोहोचले. काही जणांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेमुळं मच्छिमार मासेमारी करुन घेऊन आलेले सर्व मासे वाहून गेले आहेत. बोटींचंही मोठं नुकसान झालं आहे.
#WATCH | Odisha: A group of fishermen had a narrow escape, as their boat capsized in the turbulent sea at Aryapalli near Chatrapur in Ganjam district. All the fishermen managed to swim to the shore, and no loss of lives reported. #CycloneAsani pic.twitter.com/ZH3ryOlHvR
— ANI (@ANI) May 10, 2022
दरम्यान, स्टेट रिलीफ कमिश्नर प्रदीप जैना यांनी ट्वीट करत 12 मे पर्यंत एकही मच्छिमार समुद्रात गेला तर त्याच्यावर आपत्ती निवारण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), ओडिशा आपत्ती जलद प्रतिसाद दल (ODRAF) आणि अग्निशमन सेवांचे बचाव पथक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. बालासोरमध्ये एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असून ओडीआरएएफची एक टीम गंजम जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. पुरी जिल्ह्यातील कृष्णा प्रसाद, सातपारा, पुरी आणि अस्तरंग ब्लॉक आणि केंद्रपारा मधील जगतसिंगपूर, महाकालपाडा आणि राजनगर आणि भद्रक येथेही ODRAF टीम तयार आहेत. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.