जेलमध्ये आसारामची तब्येत बिघडली, इमर्जन्सी वॉर्डात भरती, भक्तांची हॉस्पिटलबाहेर गर्दी
माझ्या पायाचे गुडघे काम करत नाहीत. तसेच मला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे त्याने सांगितले. | Asaram bapu
जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची (Asaram Bapu) तब्येत अचानक खालावली आहे. त्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे सध्या आसाराम बापू तुरुंगवास भोगत आहे. (Asaram bapu health deterioated in jodhpur jail admitted to emergency ward)
प्राथमिक माहितीनुसार, आसारामला मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तुरुंगातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, एक तास उलटूनही फरक न पडल्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आसारामने डॉक्टरांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. माझ्या पायाचे गुडघे काम करत नाहीत. तसेच मला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे त्याने सांगितले. याशिवाय, आसारामला अन्य व्याधीही आहेत.
रुग्णालयाबाहेर आसारामच्या भक्तांची गर्दी
आसारामला रुग्णालयात आणल्यानंतर काही वेळातच त्याचे भक्त रुग्णालयात येऊन पोहोचले. या भक्तांना पोलिसांनी रुग्णालयाबाहेर काढले. आसारामला रुग्णालयाच्या एक्स-रे रूममध्ये ठेवण्यात आले होते. त्याठिकाणीच आसारामची ब्लड टेस्ट झाली. याशिवाय, त्याची कार्डिऑलॉजी आणि सीटी स्कॅनही करण्यात आले. हे सर्व रिपोर्टस नॉर्मल आले आहेत.
आसाराम सीसीयू युनिटमध्ये
महात्मा गांधी रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर आसारामला मथुरादास माथुर रुग्णालयातील सीसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. या रुग्णालयाच्या बाहेरही आसारामच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने 2018 मध्ये दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा अल्पवयीन पीडितेचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून 1 सप्टेंबर 2013 रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून बापू न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम आणि सहआरोपींवर 6 नोव्हेंबर 2013 रोजी आरोपपत्र दाखल केले होते.
(Asaram bapu health deterioated in jodhpur jail admitted to emergency ward)