“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची राज्य सरकार पाठराखण का करतय?”; सीमावादावरून राज्य सरकारवर विरोधकांची सडकून टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी ते अकाऊंट माझं नसल्याचे सांगत हॅक झाल्याचे खोटे सांगितले अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून सीमावादावरून सरकारला घेरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांनी चर्चा केली होती. त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एक इंचही जमीन देणार नाही अशी पुन्ही तिच री ओढली. त्यातून आणखी वाद चिघळला.
त्यामुळे आज विरोधकांनी पुन्हा सीमावादावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी बसवराज बोम्मई यांच्या त्या वक्तव्याचा आणि त्यांच्या त्या ट्विटचा समाचार घेत राज्य सरकारला संतप्त सवाल केले आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ज्या ट्विटमुळे महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाली, बेळगाव सीमाभागातील नागरिकांना त्याचा मनस्ताप भोगावा लागला. ते ट्विट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच ट्विटर अकाऊंटवरू करण्यात आले होते.
तरीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या वेळी ते अकाऊंट माझं नसल्याचे सांगत हॅक झाल्याचे खोटे सांगितले अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
ते त्यांचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय आहे तरीही महाराष्ट्र सरकार त्यांची पाठराखण का करते आहे असा सवाल काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
आमदार अशोक चव्हाण यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे राज्यातील आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
याची माहिती सभागृहात दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती घेऊन मी पुन्हा केंद्र सरकारबरोबर बोलून घेऊन असंही त्यांनी यावेळी सांगितले.