काँग्रेसची शकलं होण्याआधीच पक्ष सांभाळण्याची गरज…
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अजून बाकी आहे मात्र, केवळ राहुल गांधीच काँग्रेसची धुरा सांभाळतील, असंही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
नवी दिल्लीः देशात एकीकडे राहुल गांधींची (Rahul Gandhi) शांतता आणि सौहार्दपणाचा संदेश घेऊन भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) निघाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (Congress President Election 2022) जोरदार हालचालींना वेग आला आहे. राहुल गांधींची ही यात्रा संघटनात्मक क्षमता आणि राजकीय दृष्टीकोनातील कच्चे दुवे बाजूला सारत ही यात्रा अखंड सुरु असल्याचे दिसत आहे. तर पक्ष नेतृत्वासाठी पक्षांतर्गतच जोरदार गदारोळही सुरु असल्यचे दिसून येत आहे.
अशोक गहलोत यांनी सोनिया गांधीची दीड तास भेट घेतल्यानंतर गहलोतांनी आपण अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी सोनिया गांधींची माफीही मागितल्याचे सांगितले जात आहे. केंद्रातील सत्ता भाजपच्या हातात आहे तर देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसला ओळखले जात असले तरी या पक्षाला अनेक राज्यात भाजपने माती चारली आहे.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीपासून सुरू झालेली ही पराभवाची साखळी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही अव्याहतपणे सुरूच आहे.
मात्र ज्या ज्या राज्यात काँग्रेसने आपल्या पक्षाची बाजू सांभाळत सत्ता राखली, त्या त्या राज्यात नंतर पक्षांतर्गतच कुरघोड्यांना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाची आणखी शकलं होण्याआधी पक्षाला वाचवा म्हणून जाहीर आवाहन केले होते.
देशातील सर्वात मोठ्या पक्ष म्हणूनही काँग्रेसची ओळख आहे, मात्र पक्षाची सातत्याने घसरणच सुरु आहे. त्यासाठी पक्ष नेतृत्व अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या प्रक्रियेतही पक्ष आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
तर त्यानंतर सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा हातात घेतली होती, आणि त्यांनी पक्ष मजबूतीसाठी प्रयत्नही सुरू केल्याचे दिसत होते.
काँग्रेस पक्षाची घसरण होण्यास प्रमुख तीन कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे पक्ष नेतृत्वात स्पष्टतेचा असलेला अभाव.
तर दुसर कारण पक्षाची सतत कमी होत चाललेली संघटनात्मक क्षमता आणि तिसरे, राजकीय विचार किंवा वृत्तीचा अभाव. यामुळे काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत मार खावा लागत आहे.
सध्या राहुल गांधी शांतता आणि सौहार्दाचा संदेश घेऊन भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. ही यात्रा संघटनात्मक क्षमता आणि राजकीय दृष्टीकोनातून कच्चे दुवे दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तरी पक्षांतर्गत मात्र धूसफूस सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राहुल गांधी एकीकडे भारत जोडो म्हणत पक्ष मजबूतीसाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे पक्षातीलचत दिग्गजांचा संघर्ष सुरू झाला आहे.
त्यामुळे पक्षातील हा संघर्ष संपवायचा असेल तर भाजपसारख्या पक्षाकडून काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर शिकले पाहिजे असं मत राजकीय विश्लेषक मानत आहेत.
राजस्थानसारख्या राज्यातही सरकार टिकणार असं चित्र उभा राहत असतानाच पक्षांतर्गत असलेल्या दुफळीनं तोंड वर काढले आणि राजस्थानाचे दिल्लीत येऊन पोहचले.
राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गहलोत एक मजबूत नेता म्हणून उदयास येत असतानाच पक्षातील गटबाजीने पुन्हा डोकं वर काढले.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अजून बाकी आहे मात्र, केवळ राहुल गांधीच काँग्रेसची धुरा सांभाळतील, असंही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
सध्याच्या काळात काँग्रेससाठीही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याने राहुल गांधी हेच सध्या पक्षातील लोकप्रिय आणि नावाजलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व पक्षासाठी महत्वाचं मानलं जात आहे.