कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय हिंसाचाराला सुरुवात झाली. त्या हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील वैर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याच दुश्मनीतून हत्येच्या घटना अधूनमधून घडत आहेत. अशातच भाजप युवा आघाडीच्या युवा नेत्याची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
अलीपुरद्वार जिल्ह्यात भाजप युवा आघाडीच्या नेत्याचा मृतदेह बांबूच्या ढाच्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा स्थानिक समितीचे सदस्य शुभरो ज्योती घोष असे त्यांचे नाव आहे. घोष यांचा मृतदेह बुधवारी बनचुकमारी भागातील घाघरा गावात त्यांच्या राहत्या घराजवळ लटकलेल्या अवस्थेत आढळला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने भाजपचा हा आरोप फेटाळून लावला आहे. भाजपच्या राज्य युनिटने ट्विटरवर लिहिले की, “तृणमूल काँग्रेसच्या गुंडानी अलीपुरद्वार विधानसभेच्या २२ वर्षीय भाजप युवा नेता शुभरो ज्योती घोषची हत्या केली. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये अत्याचारी कायदे चालवतात. बंगालची जनता याला चोख प्रत्युत्तर देईल.
युवा नेत्याच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बक्सा फीडर रस्ता काही काळ रोखून धरण्यात आला होता. घोष मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृत्यूमागची परिस्थिती तपासण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
घोष हे मंगळवारी रात्री घरी परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबातील लोक चिंता होती. परिसरात शोध घेऊनही घोष सापडले नव्हते. अखेर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर बांबूंना लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यादरम्यान घोष यांच्या शरीराचे काही अवयव जमिनीवर पडले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ बंगाल भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, असे राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष इंद्रनील खान यांनी सांगितले.
घोष यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. ते अलिपुरद्वार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले. त्याच दिवशी अलिपुरद्वारमधील बक्सा फीडर रोडवर रास्ता रोको करण्यात आला. जवळपास 30 मिनिटांच्या आंदोलनानंतर अलीपुरद्वार पोलीस तेथे आले आणि त्यांनी या घटनेचा योग्य तपास करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. (Assassination of BJP Youth Front leader in Bengal; Allegations against Trinamool Congress)
इतर बातम्या
UP: बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गावकऱ्यांकडून आरोपीला बेदम मारहाण