अतीक-अशरफच्या हत्येनं एक नाही हजार प्रश्न निर्माण; आता पोलिसांना द्यावी लागणार या प्रश्नांची उत्तरं
उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारीच मंजूर केली होती.
प्रयागराज : गँगस्टरनाट्यातून राजकारणात प्रवेश केलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी संध्याकाळी प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जात असताना या दोघांची हत्या करण्यात आली. या दोघां भावांवर मेडिकल कॉलेजच्या बाहेरच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. त्यापेक्षा भयानक ही गोष्ट आहे की, माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर गोळी झाडण्यात आली आहे. एक दिवस आधी अतिकचा मुलगा असदच्या एन्काऊंटरनंतर ज्या पोलिसांच्या पाठीवर थाप मारली जात होती, या हत्येनंतर पोलिसांवरच प्रश्न चिन्ह उपस्थित होणार आहेत.
अतिक आणि अशरफ हे दोघेही पोलिसांच्या संरक्षणात होते, त्यामुळे त्यांच्या हत्येबाबत अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. असदच्या एन्काउंटरनंतर विरोधी पक्षाने आता योगी सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे.
अतिक आणि अहमद या दोघां भावांवर तीन तरुणांनी गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. अतिक आणि अशरफ यांना पोलिसांसमोरच गोळ्या घातल्या गेल्याने आता सरकारवर आणि पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळेच पोलीस काय करत होते असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.
गोळ्या झाडण्यात आली त्यावेळी अतिक आणि अशरफ यांना हातकड्या घालण्यात आल्या होत्या, असंही पोलिसांनी सांगितले आहे. चकमकीत मारला गेलेला गुंड असद अहमद हा तुरुंगात असलेले त्याचे वडील अतिक अहमद यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होता. साबरमती ते प्रयागराज या मार्गावर असदने त्याला उडवण्याचा कटही रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मात्र आता अशा परिस्थितीत पोलिसांनी अशा वेळी बंदोबस्त का वाढवला नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारीच मंजूर केली होती.
तर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 167 अन्वये अतीक अहमद आणि अशरफ यांची १३ एप्रिल ते १७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करून या प्रकरणाची सुनावणी 26 एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती.
मात्र आता पोलिसांच्या ताब्यातील अतिक आणि अशरफ या दोघा भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने आता योगी सरकारवरच प्रश्नांचा भडिमार सुरु करण्यात आला आहे.