प्रयागराज : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या पोलीस कोठडीत असतानाही त्यांची हत्या करण्यात आल्याने वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. तर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. वकील विशाल तिवारी यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये 2017 पासून यूपीमध्ये झालेल्या सर्व चकमकींची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीत अतिक आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी आता देशात वातावरण तापले आहे. यूपी सरकारवर आता राजकीय पक्षांकडून तसेच मानवतावादी संघटनांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने प्रकरण तापले आहे. त्याचमुळे विशाल तिवारी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात या हत्येची चौकशी करण्याची मागणी जनहित याचिका दाखल करुन केली आहे.
त्यांच्या जनहित याचिकामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखालीच हा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. याशिवाय 2017 पासून आतापर्यंत 183 चकमकींचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समिती स्थापन करून करण्यात यावा, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असताना ते माध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी पत्रकार म्हणून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
या प्रकरणी लवलेश तिवारी हा मुख्य आरोपी असून तो यूपीच्या बांदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. दुसरा शूटर शनी हमीरपूरचा रहिवासी होता आणि तिसरा अरुण मौर्य कासगंजचा रहिवासी होता. सध्या तिघेही पोलिस कोठडीत आहेत.