Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये काल रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जंगलात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. या चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.
जम्मू काश्मीर येथील डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाले आहेत. लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत आहे. सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. अंधाराचा आणि घनदाट जंगलाचा फायदा घेऊन दहशतवाद्यांना पळून जाण्याचा प्रय्तन करतील हे लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वनक्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर चकमक सुरू झाली. थोडा वेळ गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी आव्हानात्मक प्रदेशात घनदाट जंगलातून त्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला. मात्र त्यानंतर रात्री 9 च्या सुमारास जंगलात आणखी एक चकमक झाली. या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एका अधिकाऱ्यासह चौघांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जम्मू विभागाला दहशतवादी सातत्याने लक्ष्य करत आहेत. डोडा जंगलात दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यावर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसओजी) आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम राबवली आणि त्याचदरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये आठवडाभरातील ही चौथी चकमक आहे. या ऑपरेशनला ऑपरेशन कोठी असे नाव देण्यात आले .
#WATCH | Morning visuals from the Doda area of Jammu & Kashmir.
An Encounter started late at night in the Dessa area of Doda in which some of the Indian Army troops got injured.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ZQdSSRSjun
— ANI (@ANI) July 16, 2024
अतिरिक्त सुरक्षा तैनात
या चकमकीनंतर या भागात अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या असून शेवटचे वृत्त येईपर्यंत कारवाई सुरूच होती.
अलीकडच्या काळात जम्मू भागात विशेषत: पूंछ, दोडा, राजौरी आणि रियासी सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मात्र, सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रेही आहेत.
जम्मू विभागात सध्या 50 दहशतवादी सक्रिय आहेत. यातील बहुतांश दहशतवादी परदेशी म्हणजेच पाकिस्तानी आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त पथके जम्मू विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत.
#WATCH | J&K: The Indian Army uses a helicopter to carry out a search operation in the forests of Doda as the hunt for terrorists in the region is on.
Four Indian Army personnel including an Officer have been killed in action during an encounter with terrorists in Doda. pic.twitter.com/a7ydfOgusG
— ANI (@ANI) July 16, 2024
या चकमकीच्या आदल्या दिवशी म्हणजेत रविवारी लष्कराने, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये एके-47 च्या 30 राउंड, एके-47 रायफलचे एक मॅगझिन आणि एक एचई-36 हँडग्रेनेडचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती.