MLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं कार्यकर्त्यांशी लग्न, अशी जुळून आली लग्नगाठ
MLA Marriage : 28 वर्षाच्या महिला आमदाराचं तिच्याच पक्षातील कार्यकर्त्यांशी अशी जुळून आली लग्नगाठ ..
नवी दिल्ली : लग्नाच्या गाठी (Marriage Knot) या स्वर्गात जुळतात, असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल या बातमीशी या म्हणीचा काय संबंध? तर पंजाबमधील (Punjab) या घटनेने ही म्हण अधोरेखीत केली आहे. महिला आमदारानं (MLA) चक्क तिच्या पक्ष कार्यकर्त्याशी (Party Worker) आज लग्न गाठ बांधली आहे.
आमदार नरिंदर कौर या पंजाबमधील संगरुर (Sangrur) या मतदार संघातून आम आदमी पार्टीच्या (AAP) तिकिटावर निवडून आल्या आहेत. 28 वर्षांच्या कौर यांनी आप कार्यकर्ता मनदीप सिंह लक्खेवाल यांच्यासोबत आज लग्न केले.
पटियाला जवळील रोडेवाल गावामधील गुरुद्वारामध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. हा एक अनोखा विवाह सोहळा म्हणावा लागेल. मनदीप हा आप पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो आमदार कौर यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठा आहे.
या लग्नानंतर नववधू आमदार नरिंदर कौर यांनी आम आदमी पक्ष हा सर्वसाधारण लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे विवाह ही अत्यंत साधेपणाने केल्याचा दावा केला. या विवाहसोहळ्याने सोशल मीडियात सर्वांचे लक्ष वेधले.
पक्षाचे कार्य, मतदार संघातील कामासोबतच आता कौटुंबिक जबाबदारी वाढल्याचे नरिंदर कौर यांनी सांगितले. पण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना साथीदार भेटल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
मीडियानुसार, नरिंदर कौर यांचे गाव भराज आणि मनदीप सिंह यांचे गाव लखेवाल यामध्ये केवळ 2 किलोमीटरचे अंतर आहे. मनदीप सिंह यांनी आपचे मीडिया प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी कौर यांचा जोरदार प्रचारही केला आहे.
28 वर्षांच्या नरिंदर या पंजाब विधानसभेतील सर्वात कमी वयाच्या आमदार आहेत. 2022 मधील विधानसभा निवडणुकीत त्या आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 38 हजार मतांनी पराभव केला आहे. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून ती जिंकली आहे.