नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : खलिस्तान चळवळीचा खंदा समर्थक आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar Murder) याच्या हत्येवरुन गदारोळ सुरुच आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो त्यांच्याच देशात अडचणीत सापडले आहे. तर भारताने याप्रकरणी कडक भूमिका घेतल्याने त्यांचे पानिपत सर्व जग पाहत आहे. निज्जरसाठी आश्रू गाळणाऱ्या ट्रूडोंना (PM Justin Trudeau) गेल्या 15 दिवसांत ठोस पुरावे काही सादर करता आलेले नाही. पण भारतावर आरोप करुन ते पुरते अडकले आहेत. खलिस्तान चळवळ या देशात पण डोके वर काढत आहे. पण या देशाने कॅनडासारखी भूमिका न घेता, भारताला मदतीचे आश्वासन दिले आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे पक्के चाहते आहे.
खलिस्तानवाद्यांचा गेम
भारतात फुटीरतावाद्यांनी डोकं वर काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यात खलिस्तानवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांना पाकिस्तान आणि आता चीनची फूस आहे. या संघटनेसाठी काम करणारा दहशतवादी परमजीत सिंग पंजावर याला पाकिस्तानमधील लाहोरमध्ये ठार मारण्यात आले. तर अवतार सिंग खांडा याची लंडनमध्ये हत्या झाली. निज्जरच्या हत्यांपूर्वी या घटना घडल्या आहेत. पण भारताने त्यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप धुडकावून लावले आहेत.
या देशात पाळंमुळं
खलिस्तान चळवळीचं पाळंमुळं केवळ कॅनडातच घट्ट होत आहे, असे नाही तर इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पण ही चळवळ जोर धरु लागली आहे. पाकिस्तान आणि चीन त्यासाठी रसद पुरवत आहे. ऑस्ट्रेलिया तर मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर खलिस्तान्यांनी रस्त्यावर येऊन धुडगूस घातला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी तिथे काही घटना घडल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा भारताला पाठिंबा
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना, तिथल्या पंतप्रधानांनी त्यांना Boss म्हटले होते. जगभरातील मीडियामध्ये याची चर्चा झाली होती. भारताच्या सुरक्षेला कुठल्याप्रकारे धोका उत्पन्न होईल, यासाठी ऑस्ट्रेलियन भूमीचा वापर होऊ देणार नसल्याचे आश्वासन या देशाने दिले आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येणाऱ्या भारतासोबत व्यापार संबंध अधिक सदृढ करण्यावर ऑस्ट्रेलिया भर देत आहे. भारताला खलिस्तानवाद्यांविरोधात मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मदत करु शकतो.