Ayodhya Mosque : प्रजासत्ताक दिनी अयोध्येतील मशिदीचा शिलान्यास, लवकरच बांधकामाला सुरुवात
इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या सर्व 9 सदस्यांनी 9 रोपं लावत मशिदीचा सांकेतिक शिलान्यास केला. इथल्या माती परिक्षणाचा अहवाल आल्यानंतर मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.
अयोध्या : प्रजासत्ताक दिनी अयोध्येच्या धनीपूरमध्ये उभ्या राहणाऱ्या मशिदीचा शिलान्यासही आज करण्यात आला. यावेळी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनच्या सर्व 9 सदस्यांनी 9 रोपं लावत मशिदीचा सांकेतिक शिलान्यास केला. इथल्या माती परिक्षणाचा अहवाल आल्यानंतर मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. राम जन्मभूमीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनीपूर इथं 5 एकर परिसरात ही मशिद बांधला जाणार आहे. त्याचबरोबर एक रुग्णालय आणि कम्युनिटी किचन, कल्चरल हॉलचंही बांधकाम केलं जाणार आहे.(Foundation stone of the mosque in Ayodhya on Republic Day)
26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी शिलान्यास केल्यानंतर आता अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसह मशिदीचीही उभारणी होणार आहे. प्रदीर्घ चाललेल्या अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेल्या आदेशानंतर अयोध्येपासून 5 किलोमीटर अंतरावरील धनीपूर इथं मशिदीला जमीन देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत उत्तर प्रदेश सरकारनंही सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन दिली. त्यानंतर आता इंडो इस्लामिक फाऊंडेशन लवकरच माती परिक्षण करुन मशिदीच्या निर्माणाला सुरुवात करेल, असं सांगण्यात येत आहे.
कशी असेल धनीपूरमधील मशीद?
अयोध्येपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर ही मशिद असणार आहे. नुकतेच या मशिद आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे फोटो जारी करण्यात आले आहेत.
कुछ इस तरह नजर आएगी अयोध्या मस्जिद। @IndoIslamicCF ने जारी किया मस्जिद व हॉस्पिटल का डिजाइन pic.twitter.com/wNJyYaoA19
— Shobhit Srivastava (@shobhit81) December 19, 2020
मशिदीसह अजून काय?
मशिदीसाठी देण्यात आलेल्या 5 एकर जागेवर मशिदीची मुख्य इमारत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रंथालय, कम्युनिटी किचन, म्युझियम आणि रिसर्च सेंटर बनवण्यात येणार आहे. रिसर्च सेंटरच्या निर्मितीसाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यापीठाचे स्थापत्यशास्त्र विभागातील प्राध्यापक एसएम अख्तर यांची मदत घेण्यात आली आहे. मशिदीची इमारत ही जवळपास 15 हजार वर्ग फुटात आधुनिक शैलीत बनवली जाणार आहे. देशभरातील अन्य मशिदींपेक्षा ही इमारत वेगळी आणि आकर्षक असेल असा दावा करण्यात आला आहे.
मशिद परिसरातच वीज निर्मिती!
संपूर्ण 5 एकर परिसरात लागणारी वीज इथूनच निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी खास तयारीही करण्यात आली आहे. झिरो एनर्जीवर आधारित असलेल्या इमारतीमध्ये 100 टक्के वीज ही सोलार पॅनलवर तयार केली जाणार आहे. या परिसरात हिरवळीसोबतच पाणी बचतही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. मशिदीसह याच परिसरात अजून एक टोलेजंग इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये एक रुग्णालय आणि प्रशासकीय भवन असेल. तर एक ग्रंथालयही असणार आहे. इथं बनवण्यात येणाऱ्या संग्रहालय आणि अभिलेखागाराची निर्मिती इतिहासकार पुष्पेश पंत यांच्या सल्ल्यानुसार केली जाणार आहे.
गरिबांना मोफत जेवण
महत्वाची बाब म्हणजे याठिकाणी गरिबांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. रोज 5 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडून सामुहिक किचन बनवलं जाणार आहे. त्यातून रुग्णालयातील रुग्णांसह इथं येणाऱ्या गरिबांना जेवण दिलं जाईल. त्याचबरोबर परिसरातील कुपोषित मुलं आणि मातांनाही जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
राम मंदिराचं भूमिपूजन झालं, पण अयोध्येतील मशिद कशी असेल?
अयोध्येत होत असलेली मशिद कशी आहे ? वाचनालय, रूग्णालय आणि बरंच काही, स्पेशल रिपोर्ट
Foundation stone of the mosque in Ayodhya on Republic Day