Ayodhya Ram Mandir | अयोध्यानगरी सजली, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी
अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे
लखनौ : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून उद्या (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे. (Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Preparations)
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आले आहे.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अद्ययावत गाड्या आणि सुरक्षा ताफ्याची अयोध्येच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. साकेत महविद्यालयाच्या मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका
सकाळी 9.35 वा. – दिल्लीतून प्रस्थान सकाळी 10.35 वा. – लखनौ विमानतळावर आगमन सकाळी 10.40 वा. – हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान सकाळी 11.30 वा. – अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर आगमन सकाळी 11.40 वा. – हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा दुपारी 12.00 वा. – राम जन्मभूमी परिसरात आगमन दुपारी 12.15 वा. – राम जन्मभूमी परिसरात वृक्षारोपण दुपारी 12.30 वा. – श्रीराम मंदिर भूमिपूजन दुपारी 12.40 वा. – श्रीराम मंदिर पायाभरणी दुपारी 02.05 वा. – साकेत कॉलेज हेलिपॅडकडे प्रस्थान दुपारी 02.20 वा. – हेलिकॉप्टरने लखनौकडे प्रस्थान, लखनौहून दिल्लीसाठी प्रस्थान
पवित्र माती आणि जल अयोध्येत
भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांचे 135 संत उपस्थिती लावणार आहेत. जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे. हनुमान गढीवर पताका चिन्हाचे पूजन करण्यात आले आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस संपत राय यांच्या माहितीनुसार कोविड19 च्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेची दखल घेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कठोर असेल. भूमिपूजनासाठी 175 जणांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व आमंत्रित व्यक्तींनी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भूमिपूजन प्रांगणात येणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
एक लाख 11 हजार लाडू तयार
राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या नियोजित ठिकाणी पूजा होईल. अयोध्येत प्रसादासाठी 1 लाख 11 हजार लाडू तयार केले जात आहेत. राम मंदिराचा प्रसाद भारतीय दूतावास जगभर वाटणार आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल. नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत. स्तंभांची संख्या 160 वरुन 366 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मंदिराच्या जिन्याची रुंदी 6 फुटांवरुन 16 फूट करण्यात आली आहे. मंदिराची उंची 141 फुटांवरुन 161 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
श्री राम जन्मभूमि मन्दिर विश्व में भारतीय स्थापत्य कला का अनुपम उदाहरण होगा।
जन्मभूमि मन्दिर के प्रस्तावित मॉडल के कुछ चित्र।
Shri Ram Janmbhoomi Mandir will be a unique example of Indian architecture.
Here are some photos of the proposed model.
जय श्री राम! Jai Shri Ram! pic.twitter.com/8kJ4qEYah2
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 4, 2020
राम मंदिरासाठी देणग्यांचा ओघ सुरुच आहे. देणगी देण्याबाबत भक्तांकडून सातत्याने विचारणा होत आहे. चांदीच्या विटा देण्याऐवजी बँक खात्यात देणगी द्या, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भक्तांना केले आहे.
(Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan Program Preparations)