हालचाली वाढल्या, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तारीख ठरली, जंगी कार्यक्रम होणार
अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असणार आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी येणार आहेत.
नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : अयोध्येतील श्रीराम मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यावर आल्याची माहिती समोर आली आहे. श्रीरामांचं अतिशय भव्य असं मंदिर इथे उभारलं जात आहे. या मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रमदेखील तितकाच जंगी असणार आहे. त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराचं बांधकाम आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या भव्य उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जगभरातून 130 देशांतून प्रतिनिधी, साधूसंत अयोध्येत येणार आहेत. राम मंदिराचं 22 जानेवारीला सकाळी उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
130 देशांचे प्रतिनिधी येणार
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. या मंदिराच्या उद्घाटनाची तारीख अखेर 22 जानेवारीला निश्चित झाल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर उद्घाटनाचा मुहूर्त ठरलेला आहे. लवकरच श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाण्याची शक्यता आहे. तसेच जगभरातील 130 देशांमधील प्रतिनिधी आणि साधुसंत या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
राम मंदिराचं आतापर्यंत 92 टक्के काम पूर्ण झालेलं आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता 22 जानेवारीची तारीख निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जवळपास सात दिवसांचा हा कार्यक्रम असेल. अधिकृतपणे सर्व उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतरच सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुलं होईल.
देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या वेळी भाजपकडून राम मंदिराच्या उद्घटनाचा मुद्द्यावरुन प्रचार केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याआधीदेखील सरकारकडून काशी, अयोध्या येथे करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबाबत आपल्या भाषणात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत. याशिवाय राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याची सर्वसामान्य भक्तदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर भक्तांनाही दर्शन घेता येणार आहे.