Ram Mandir : 22 जानेवारीलाच आमची डिलिव्हरी करा, गर्भवती महिलांची डॉक्टरांकडे अजब मागणी
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार असून श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही होईल. असा दुर्मिळ योग असलेल्या शुभ मुहर्तावरच आपली प्रसूती व्हावी यासाठी अनेक गर्भवती महिला आग्रही आहेत. त्याच दिवशी आपल्या बाळाचा जन्म व्हावा अशी विनंती अनेक महिलांनी डॉक्टरांना केली असून सिझेरियनसाठी सल्ला घेतला जात आहे. तसेच ज्योतिषांकडेही सल्ला मागितला जात आहे.
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी झाली असून देशातील हजारो नागरिकांना, सेलिब्रिटींना या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण याचदरम्यान देशभरात वेगळंच वातावरण पहायला मिळत आहे. राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा दुर्मिळ योग असलेल्या शुभ मुहुर्त असलेल्या 22 जानेवारीलाच आपली डिलीव्हरी व्हावी असा अनेक गर्भवती महिलांचा आग्रह आहे. अनेक खासगी तसेच सरकारी हॉस्पिटल्समध्ये दररोज किमान पाच ते 10 गर्भवती महिला या 22 जानेवारीला सिझेरियन डिलीव्हरीसाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करताना दिसत आहेत.
डिलीव्हरीसाठी ज्योतिषांचाही घेत आहेत सल्ला
तर ज्या प्रकरणांमध्ये सिझेरियन आवश्यक आहे, त्या तारखेच्या आसपास (सीझर ऑपरेशन) केले जाऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु ज्या प्रकरणांमध्ये सिझेरियनची आवश्यकता नाही, अशा प्रकरणांमध्ये ते विशिष्ट तारखेला करणे शक्य नाही, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय या दिवशी प्रसूतीबाबत ज्योतिषांकडूनही सल्ला घेण्यात येत आहे.
घरातील वडीलधाऱ्या मंडळींचीही साथ
रामलल्लाच्या आगमनासोबतच आपल्या घरीही बाळाचे आगमन व्हावे अशी अनेक दांपत्यांची इच्छा आहे. ज्या महिलांची प्रसूती 22 जानेवारीच्या सुमारास होणार आहे, अशा महिलाही या शुभ दिवशी प्रसूतीसाठी डॉक्टरांकडे अर्ज करत आहेत. गर्भवती महिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती आणि कुटुंबातील वडीलधारी मंडळीही त्यांना साथ देताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात असे विनंती करणारे अर्ज यायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी सीझर करण्यासाठी अनेक जोडपी तयार आहेत.
22 जानेवारीला प्रसूतीसाठी डॉक्टरांवर दबाव
एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सर्व डिलीव्हरी केससाठी कोणताही विशिष्ट दिवस निश्चित केला जाऊ शकत नाही. अशा काही केसेस आहेत, ज्यांना 15 दिवसांत सिझेरियन करावे लागते, अशा परिस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार 22 जानेवारी ही तारीख निश्चित केली जाऊ शकते, असे डॉक्टर म्हणाले. तर दुसरीकडे काही रुग्णालयात गर्भवती महिलांकडून सिझेरियन प्रसूतीसाठी डॉक्टरांवर सातत्याने दबाव टाकला जात आहे. पण अनेक प्रकरणांमध्ये सिझेरियन करता येत नाही. सिझेरियन डिलिव्हरी फक्त आवश्यक असल्यासच केली जाऊ शकते.
अशी डिलीव्हरी ठरू शकते घातक
अनेक डॉक्टरांनी अशा (सीजर) डिलीव्हरीला विरोध दर्शवला आहे. कारण असे केल्याने ती महिला आणि जगात येणार बाळ दोघांच्याही आयुष्याला धोका असू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र मुदतीपूर्वीच डिलीव्हरी झाल्यास धोका असतो, अनेक जोडप्यांचे त्याकडे दुर्लक्ष होते, असे डॉक्टरांनी नमूद केले.