Ayodhya | पंतप्रधान मोदींचे भाषण, 200 पाहुणे, राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला
पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. पुढील बुधवार अर्थात 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत हा सोहळा होणार आहे. (Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)
पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. निश्चित मुहूर्त आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची तयारी यानुसार पूजा केली जाईल.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्याचप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी नेते विनय कटीयार, कल्याण सिंह यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. अयोध्येत त्या पवित्र सुवर्ण मुहूर्तासाठी जोमात तयारी चालली आहे.
हेही वाचा : Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
अयोध्येतील राममंदिरासाठी अवघ्या देशातून पवित्र माती आणि पाणी पाठवलं जातं आहे. नागपूरमधील रामटेक एक पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणच्या पुरातन राम मंदिराला पौराणिक संदर्भ आहेत. राम वनवासात असताना रामटेकमध्ये वास्तव्यास होते, असं सांगितलं जातं. तिथल्या एका डोंगरावर 600 वर्षे जुने राम मंदिर आहे. त्याच मंदिरातील पवित्र माती अयोध्येला पाठवली गेली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
नागपूरमधील अंभोरा एक पवित्र तीर्थस्थान आहे. त्या ठिकाणी पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या अंभोरामधून पंचनद्या संगमाचं पवित्र पाणीही अयोध्येला पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ते कुरिअरनं पाठवलं गेलं आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल” (Ayodhya Ram Mandir Temple Stone Foundation Program)