Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी 48 वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय, त्यांच्या हत्येनंतर काय म्हणाले राहुल गांधी? राज्य सरकारवर साधला निशाणा
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्ये राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला. या पक्षात त्यांनी 48 वर्षे काम केले. या फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्यावर शनिवारी जवळून गोळीबार करण्यात आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईत बाबा सिद्दीकी यांचे चांगले प्रस्थ होते. राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडपर्यंत त्यांचा प्रभाव होता. शनिवारी रात्री त्यांच्यावर शूटर्सनी जवळून गोळीबार केला. त्यांना तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत ते गतप्राण झाले होते. बाबा सिद्दीकी हे जवळपास 48 वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अजित पवार गट जवळ केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता विरोधकांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेने आपण दुखी झाल्याचे ते म्हणाले. या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी समाज माध्यम एक्सवर याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी राज्याच्या सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था घसरत चालली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असे ते म्हणाले.
The tragic demise of Baba Siddique ji is shocking and saddening. My thoughts are with his family in this difficult time.
This horrifying incident exposes the complete collapse of law and order in Maharashtra. The government must take responsibility, and justice must prevail.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 13, 2024
सरकारने जबाबदारी स्वीकारावी
महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची वार्ता वेदना देणारी आहे. या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबिय, मित्र आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहे. याप्रकरणाची महाराष्ट्र सरकारने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. न्याय मिळावा. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी. सरकारने याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
कायदा आणि सुव्यवस्था ढासळली
बाबा सिद्दीकी यांची हत्या धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी मी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ही घटना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.