तुम मुझे साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनाएंगे, बागेश्वर बाबांची साद, म्हणाले बांगड्या घालून घरात….
मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाम हे एक चंदेलकालीन प्राचीन सिद्ध पीठ आहे.
रायपूरः बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) पं धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबांच्या (Bageshwar Baba) नव्या वक्तव्याने आता खळबळ माजली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला होता, तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा… मी आज नवा नारा देतोय. तुम्ही मला साथ द्या, आपण हिंदू राष्ट्र उभारू.. असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय. छत्तीसगड राज्यातील रायपूरमधील गुढियारी परिसरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची रामकथा आयोजित करण्यात आली. १७ ते २३ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
काल सोमवारी या कथेचा समारोप झाला. या वेळी व्यासपीठावरून लोकांना प्रोत्साहन देताना बागेश्वर बाबांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, भारताचे वीर सुभाषचंद्र बोस यांचा नारा होता.. तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा… आज मी नवा नारा देतोय. तुम्ही मला साथ द्या, आपण हिंदू राष्ट्र बनवू…
भारतातल्या नागरिकांनो घरात बांगड्या घालून बसू नका.. हे वक्तव्य ऐकताच व्यासपीठासमोर बसलेल्या श्रोत्यांमधून जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या..
माझ्यावर आरोप केले जातायत…
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, आज माझ्यावर बोट ठेवलं जातंय. यापुढेही सनातनी लोकांबाबत असंच होणार आहे. आजच तुम्ही घरातून बाहेर पडला नाहीत तर तुम्ही बुडदिल आहात, असे मी मानेन. भारतात असं कुणीही नाही, ज्यांच्यावर टीका झालेली नाही. सर्वांनाच कसोटी पार करावी लागते.
कोण आहेत बागेश्वर बाबा?
मध्य प्रदेश येथील बागेश्वर धाम हे एक चंदेलकालीन प्राचीन सिद्ध पीठ आहे. अनेक वर्षांपासून गढा येतील बाबा सेतुलाल महाराज उर्फ भगवानदास महाराज निर्मोदी आखाडा, चित्रकूट येथून दीक्षा घेऊन बागेश्वर धामला आले होते. त्यानंतर त्यांनी इथे मोठा यज्ञ केला होता.
26र्षांचे धीरेंद्र शास्त्री सांगतात, त्यांच्या आजोबांच्या काळापासून ही परंपरा आहे. त्यांचे पूर्वज येथे येऊन दरबार भरवत आणि लोकांच्या समस्या दूर करत असत. छत्तरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम आहे. मागील दोन वर्षात धीरेंद्र शास्त्र उर्फ बागेश्वर बाबा जास्त प्रसिद्ध झाले आहेत. लोकांच्या मनातील गोष्टी, अनोळखी लोकांना ओळखण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे असल्याचा दावा बागेश्वर बाबा यांनी केला आहे.
श्याम मानव यांना धमकी…
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांच्या चमत्कारांना आव्हान दिलंय. त्यानंतर श्याम मानव यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. बागेश्वर बाबांच्या भक्तांकडून या धमक्या येत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. श्याम मानव यांच्या नागपूर येथील घराला अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.