नवी दिल्ली: बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आपल्याकडे चमत्कारी शक्ती असल्याचा दावा धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे. त्यामुळे ते वादात अडकले आहेत. त्यांच्यावर अंधश्रद्धा फैलावण्याचा आरोप करण्यात येत आहे. काही लोक बागेश्वर बाबांचं समर्थन करत आहेत. तर काही लोक विरोध करत आहेत. बागेश्वर बाबा यांचं समर्थन करणाऱ्यांमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते म्हणजे प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचं. देवकीनंदन ठाकूर यांनी बागेश्वर बाबांना पाठिंबा दिला आहे.
देवकीनंदन ठाकूर यांनी बागेश्वर बाबांना पाठिंबा देतानाच सनातन धर्माला मानणाऱ्यांनी आपल्यात फूट पडू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पाद्री आणि मौलवी काहीही दावे करतात, तेव्हा अंधश्रद्धा होत नाही.
परंतु जेव्हा एखादा सनातनी लोकांचं दु:ख दूर करतो, लोकांना संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही लोकांच्या पोटात दुखतं. सनातनी लोक कुणाचीच फसवणूक करत नाही. कुणाकडे पैसेही मागत नाहीत, असं सांगतानाच वारंवार सनातनी धर्मालाचा का टार्गेट केलं जातं? असा सवाल देवकीनंदन ठाकूर यांनी केला आहे.
बागेश्वर बाबा यांना बाबा रामदेव यांनीही पाठिंबा दिला आहे. काही पाखंडी लोक बागेश्वर बाबांवर तुटून पडले आहेत. बालाजींची कृपा काय आहे? हनुमानाची कृपा काय आहे? असा सवाल त्यांना केला जात आहे, असं बाबा रामदेव म्हणाले.
स्वामी जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी तर बागेश्वर बाबा यांना मोठं आव्हानच केलं आहे. बागेश्वर बाबा चमत्कार दाखवतात. मग त्यांनी जोशीमठाबाबतची माहिती द्यावी. जोशीमठ येथे भुस्खलन होत आहे. हे भुस्खलन त्यांनी रोखून दाखवावं. जोशीमठ परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्याबाबत त्यांनी सांगावं, तरच मी त्यांचा चमत्कार मानेन, असं शंकराचार्याने म्हटलं आहे.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा धर्म आणि श्रद्धेचा विषय आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी त्यांच्याकडे जावं. ज्यांची नसेल त्यांनी जाऊ नये. ईश्वरीय शक्ती असते आणि ही शक्ती काही लोकांना जन्मासोबतच मिळते. टीकाकार आणि त्यांना मानणारे आपआपली मते मांडू शकतात, असं चंपत राय म्हणाले.
हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्राची यांनी बागेश्वर बाबा यांचं समर्थन केलं आहे. बागेश्वर धाम चांगलं काम करत आहे. माझं बागेश्वर धामला उघड समर्थन आहे. बागेश्वर धाम सनातनची परंपरा पुढे नेण्याचं काम करत आहे. बागेश्वर बाबा चादर आणि फादरला घाबरणार नाही. त्यांची परीक्षा घेतली जात आहे, असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे.