पीएफआयची आता खैर नाही…देशातून नामोनिशान मिटवणार
केंद्र सरकारने पीएफआयच्या सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून पीएफआयबाबत (PFI) बंदीची कारवाई केल्यानंतर आता पीएफआयचे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामचे अकाऊंट आणि यूट्यूब चॅनेलसह (Social Media) सगळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पीएफआयच्या सर्व संलग्न संस्थांना लागू होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने पीएफआयच्या सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवर बंदी (Website ban) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेकायदेशीर सगळ्याच गोष्टींवर प्रतिबंधक कायदा (UAPA) च्या कलमांखाली बुधवारी, 28 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
त्यानंतर संस्थेच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनेलसह सर्व ऑनलाइन असणाऱ्या गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून लावण्यात आलेले हे निर्बंध पीएफआयच्या सर्व संलग्न संस्थांना लागू होणार आहेत. आता या संघटनांचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले जाणार असून त्यांनी केलेल्या पोस्टही हटवण्यात येणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.
या संघटनांच्या कारवाईत रिहॅब इंडिया फाउंडेशन (आरआयएफ), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय), ऑल इंडिया इमाम काउन्सिल (एआयआयसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन (एनसीएचआरओ), नॅशनल वुमेन्स फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि यांचा समावेश आहे.
पीएफआयवर कारवाई केली गेल्यानंतर तपास यंत्रणांचा अहवाल येईपर्यंत पीएफआय, आरआयएफ आणि एआयआयसीच्या वेबसाइट्सही बंद करण्यात आल्या आहेत. तर इतर संलग्न असणाऱ्या संघटनांच्या संस्थांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडियाच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली असून ट्विटर आणि फेसबुकवर देशविरोधी आणि देशविघातक काम करणाऱ्या संघटनांची अकाऊंटही काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.