बंगळुरूः चाराण्याची कोंबडी अन् 12 आण्याचा मसाला… अशीच गत झाली एका कारची. कार आहे11 लाखांची आणि दुरुस्तीचा (Repairing) खर्च आलाय तब्बल 22 लाख. हे बिल पाहून मालकाचे डोळे चक्रावले. त्यानं घेतला फोन, लावला विमा कंपनीला. विचारलं…काय गफलाय? विशेष म्हणजे कार दुरुस्तीसाठीच्या व्यवहाराचा खर्चही 44 हजार सांगितला. जो फार तर पाच हजारांपर्यंत असू शकतो. मग काय? मालकानं आणखी डोकं चालवलं. सध्या आपल्याकडे सोशल मीडियाचं (Social Media) हत्यार आहे ना… टाकली पोस्ट… भिर्र भिर्र फिरली. कंपनीला अधिकृतरित्या मेलही टाकला.
भारताची सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळुरूतील एका व्यक्तीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. काही दिवसांपूर्वी या सिलिकॉन व्हॅलीचे पावसामुळे बेहाल झाले.
पूरातून कसेबसे सावरत असंख्य घरटी आता पुन्हा एकदा संसार नव्याने थाटू लागलेत. खराब झालेली वाहनं दुरुस्त करायला टाकत आहेत. अशातच एका व्यक्तीने पूरामुळे खराब झालेली कार दुरूस्त करण्यासाठी टाकली. दुरुस्तीचं बिल पाहून सदर व्यक्तीने लिंक्ड इन वर पोस्टच टाकली…
ही पोस्ट आहे बंगळुरूतील अॅमेझॉनचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत अनिरुद्ध गणेश यांची. त्यांनी volkswagan कार दुरूस्त करण्यासाठी रिपेअरिंग सेंटरमध्ये पाठवलं होतं.
त्यांची volkswagan Polo Hatchback कारची किंमतच 11 लाख रुपये आहे. पण कार दुरूस्त करून आल्यावर हे बिल तब्बल 22 लाख रुपये आलं.
विशेष म्हणजे सर्व्हिस सेंटरने डॅमेज कारसाठीची कागद पत्र तयार करण्याकरिता त्यांना जवळपास 44,840 रुपये मागितले.
कारच्या किंमतीपेक्षा दुप्पट दुरूस्तीसाठीचा खर्च हा कुणालाही पटणारा नाही. अनेकदा अव्वाच्या सव्वा लाईट बिल आलेलं आपण ऐकतो. पण कारदुरुस्तीचा एवढा खर्च ऐकलेला नाही.
अनिरुद्ध यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर फोक्सव्हॅगन मॅनेजमेंटला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कंपनीने 5 हजार रुपयांत हे प्रकरण सेटल केलं.
पण अनिरुद्ध गणेश यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.