नवी दिल्लीः उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन सहा जवान शहीद झाल्याची घटना घडलेली असतानाच झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंट येथे आज फील्ड फायरिंग (Field Firing) सरावादरम्यान टी-90 टँकच्या बॅरलचा स्फोट झाला. यामध्ये एका जीसीओसह (JCO) दोन भारतीय लष्कराच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज झाशीजवळील बाबिना कॅन्टोन्मेंटमध्ये फील्ड फायरिंगचा सराव केला जात होता. त्यावेळी भारतीय लष्कारातील तीन जवानाच्या आधारे एक टँक चालवला जात होता.
त्यावेळी अचानक त्याचा स्फोट झाला. त्यावेळी मोठ्याने स्फोट झाल्याने त्या आगीत दोघा सैनिकांसह आणखी एक सैनिक त्या स्फोटात जळाला.
त्यानंतर जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या लष्कर खात्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमी सैनिकावर पुढील उपचार सुरू आहेत.
फायरिंगचा सराव करताना ही घटना कशी घडली याचा तपास सध्या सुरू आहे. भारतीय लष्कराकडूनही या घटनेची चौकशी करण्यात येत असून या प्रकरणाचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती भारतीय लष्कराकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
सरावा दरम्यान ही घटना घडली असल्याने याची कसून चौकशी केली जात असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात कोण दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.