उष्णतेच्या लाटेचा कहर, 10 दिवसात एवढ्या लोकांचा जीव गेला, पण आता
कडाक्याच्या गरमीमुळे जिल्हा रुग्णालयात गेल्या 10 दिवसांत अनेक रुग्णांचा जीव गेला असून आता परिस्थिती हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र असे असले तरी रुग्णांच्या संख्येत मात्र वाढच होत आहे.
लखनऊ : आषाढ महिना सुरू झाला तरी पावसाचे काहीच नामोनिशाण दिसत नसून देशातील बऱ्याच भागात अद्यापही कडाक्याचा उन्हाळाच (hot summer) आहे. उत्तर प्रदेशमध्येही सध्या उन्हाचा कडाका वाढत असून त्याचा परिणाम लोकांच्या तब्येतीवर होताना दिसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बलिया येथील जिल्हा रुग्णालयात (hospital) 10 दिवसांमध्ये 100 हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले असून आता हळूहळू परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र असे असले तरी रुग्णांच्या संख्येत मात्र वाढच होत आहे.
मंगळवारी दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयात विविध आजारांनी ग्रासल्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वातावरणातील उष्णता वाढल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. गेल्या 24 तासांत रुग्णालयात 180 रुग्ण दाखल झाले आहेत.
एवढेच नव्हे तर रुग्णालयात 250 हून अधिक खाटा भरलेल्या असून सर्व वॉर्डांमध्ये व्यवस्था अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच संसाधनेही वाढवली जात आहेत. वाढत्या उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रत्येक वॉर्डात एसी बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केली रुग्णालयाची पाहणी
जिल्हा दंडाधिकारी रविंद्र कुमार यांनी मंगळवारी सकाळी रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तर दुसरीकडे शासन स्तरावरून तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण क्षेत्रातील विविध भागांची तपासणी करून हीट व्हेव संदर्भात माहिती गोळा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तापमानात तर वाढ होत आहेच, पण ग्रामीण क्षेत्रातील विविध भागांत होणाऱ्या वीज कपातीमुळेही ( आजारी पडण्याची) ही समस्या वाढताना दिसत आहे.
एका आठवड्यापूर्वी रुग्णांच्या अकस्मात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सीएमएस डॉ. दिवाकर सिंह यांची शासनस्तरावरून बदली करण्यात आली होती. उष्माघातामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या अनेक बातम्या समोर येत असतानाच, विविध आजारांमुळे ग्रस्त असलेल्या बहुतांश वृद्ध नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. वातावरणातील गरमी किंवा उष्णता वाढल्याने रोगांचा प्रभावही वाढू शकतो.