भीक मागणाऱ्या महिलेची देशभक्ती, जमवलेली सर्व रक्कम शहिदांना समर्पित
जयपूर: राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती काही औरच आहे. आयुष्यभर भीक मागून जमा केलेली रक्कम शहिदांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. देवकी शर्मा असं या भीक मागणाऱ्या महिलेचं नाव आहे. खरंतर देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. सहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. मात्र त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची जमापुंजी शहिदांच्या कुटुंबाला दिली आहे. […]
जयपूर: राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती काही औरच आहे. आयुष्यभर भीक मागून जमा केलेली रक्कम शहिदांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. देवकी शर्मा असं या भीक मागणाऱ्या महिलेचं नाव आहे. खरंतर देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. सहा महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आहे. मात्र त्यांच्याच इच्छेनुसार त्यांची जमापुंजी शहिदांच्या कुटुंबाला दिली आहे.
अजमेरमधील बजरंग गड इथे माता मंदिर आहे. गेल्या 7 वर्षांपासून देवकी शर्मा या मंदिराबाहेर भीक मागून गुजरान करत होत्या. मृत्यूपूर्वी या महिलेने भीक मागून 6 लाख 61 हजार 600 रुपये जमा केले होते. हे पैसे बजरंगगढ इथल्याच बँक ऑफ बडोदामधील अकाऊंटमध्ये जमा केले होते.
मात्र मृत्यूपूर्वी देवकी शर्मा यांनी अंबे माता मंदिराच्या विश्वस्तांना आपली रक्कम काही चांगल्या कामासाठी खर्च करा असं सांगितलं होतं. त्यानुसार मंदिराचे विश्वस्त संदीप यांनी देवकी शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्यांनी जमवलेली रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे बँक ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली.
महिलेने भीक मागून जमवलेली संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली. या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार ती रक्कम पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. राजस्थानातील शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी मदत म्हणून हे पैसे देण्यात येणार आहेत.
देवकी शर्मा भीक मागून जमवलेले पैसे घरात ठेवत होत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंथरुणाखाली आणखी दीड लाख रुपये मिळाले होते. हा पैसाही मंदिर समितीने बँकेत जमा केला होता. देवकी यांच्या इच्छेनुसार त्यांचा पैसा चांगल्या कार्यासाठी वापरण्यात यावा. त्यानुसार तो पैसा देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे.