हाती तिरंगा, 45 डिग्री तापमान, भारत जोडो यात्रेची प्रेरणा आणि ‘त्या’ लहानग्यांची 101 किलोमीटरची पदयात्रा
सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथील चार मुले 101 किलोमीटर पायी चालत भोपाळला पोहोचली. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून प्रेरित होऊन त्यांनी याची सुरुवात केली. टीम गुलक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लहानग्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेत त्यांना पिगी बँक दिल्या.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान असणार आहे. कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. तर, भाजपही मोठ्या ताकदीने रणांगणात उतरला आहे. दोन्ही पक्षांचे सर्मथकही उघडपणे आमनेसामने येत आहेत. त्यातच सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथील चार लहान मुलांनी 101 किलोमीटरची पदयात्रा काढत काँग्रेसला पाठिंबा दिला. आष्टा ते भोपाळ अशी पदयात्रा काढत त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची त्यांच्या घरी भेट घेत त्यांना पिगी बँक भेट म्हणून दिली.
कडाक्याच्या उन्हात पायी चालत भोपाळला आलेली ही चारही मुलं भाऊ-बहीण आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने प्रेरित होऊन त्यांनीही पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे कमलनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे हा त्या मुलांचा उद्देश आहे.
यातील सर्वात मोठा राजकुमार परमार हा 16 वर्षांचा तर जिया परमार हा 15 वर्षांचा आहे. हे दोघे अकरावीत आहेत. जतिन (१३) हा दहावीचा आणि यश राज (९) हा सहावीचा विद्यार्थी आहे.
भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी पाच राज्यात 42 दिवस पदयात्रा केली. भारत जोडो यात्रेत जनतेच्या समस्या पाहिल्या. त्याचवेळी त्यांनी स्वतः पदयात्रा करायची असे ठरवले होते.
राहुल गांधी यांनी दिले टीम गुलक नाव
बुरहानपूर मार्गे भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली होती. त्यावेळी हे चौघे त्या यात्रेत सामील झाले होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आपल्याकडील गल्ला त्यांनी राहुल गांधी यांना भेट दिला. तेव्हापासून ते टीम गुलक म्हणून ओळखले जाऊ लागले.
21 मे रोजी आष्टा येथून निघाले
21 मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आष्टा येथून पदयात्रेला सुरुवात केली. चार दिवसांत त्यांनी 101 किलोमीटरचे अंतर कापले. सकाळी सहा ते दुपारी अकरापर्यंत ते चालायचे. मग, दुपारच्या विश्रांतीनंतर चार वाजता ते पुन्हा चालायचे. संध्याकाळी आठ वाजता ते रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबायचे. यादरम्यान स्थानिकांना भेटून त्यांच्या समस्या ते जाणून घेत असत.