इंडीया आघाडीला झटका, 2024 लोकसभेसाठी मायावतींचे एकला चलो रे !
एकीकडे केंद्रातील भाजपाचा घौडदौड रोखण्यासाठी इंडिया आघाडीची मोट बांधण्यासाठी राहुल गांधी जंगजंग पछाडत असताना दुसरीकडे बसपाच्या प्रमुख मायावतींनी इंडिया आघाडीला ठेंगा दाखविला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आघाडीमुळे आपल्या पक्षाचे नुकसान होत असून एकट्याने 2024 च्या निवडणूका लढण्याची तयारी करण्याचे आदेशच मायावतींनी दिले असल्याने इंडिया आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
उत्तर प्रदेश | 15 जानेवारी 2024 : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौखुर विखरुलेल्या वारूला अडविण्यासाठी इंडीया आघाडी विरोधकांची मोट बांधत आहे. त्यातच उत्तर प्रदेशात बसपाच्या मायावतींची साथ मिळेल अशी कॉंग्रेसची आशा धुळीला मिळाली आहे. कारण बसपाच्या प्रमुख इंडिया आघाडीला साथ न देता एकट्याने 2024 च्या लोकसभा निवडणूका एकट्यानेच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतीने सोमवारी त्यांचा पक्षांच्या कार्यकर्त्यांना बंधू भावाने लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यास सांगितले आहे. आघाडी केल्याने बसपाची मते दुसऱ्या पार्टीना जातात परंतू त्यांची मते आपल्या पार्टीला ट्रान्सफर होत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून मणिपूरच्या इंफाळ येथून सुरु होत आहे.
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसाच्या ( 15 जानेवारी ) मुहूर्तावर त्यांनी समजवादी पार्टी ( सपा ) प्रमुख अखिलेश यादव यांच्या जोरदार टिका केली आहे. त्यांनी यादव यांना सरड्यासारखा रंग बदलणारा असे म्हटले आहे. वास्तविक अखिलेश यांनी मायावतींना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. परंतू मायावतींना या शुभेच्छांना न स्वीकारता एका पार्टीच्या प्रमुखाने सरड्या सारखा रंग बदलत आपल्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बसपाच्या कार्यकर्त्यांनी सपा आणि अखिलेश यादव यांच्या पासून सतर्क रहावे असा सल्लाही मायावतींनी दिला आहे.
आघाडीत आपले जास्त नुकसान – मायावती
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश माझ्याबद्दल खोटे आरोप करीत आहेत. अखिलेश पासून सावधान रहाण्याची गरज आहे. आघाडीचा लाभ घेण्यासाठी अखिलेश यांचे वक्तव्य समोर आले आहे. परंतू आम्हाला तर आघाडीमुळे जास्त नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीत सामील होणार नसल्याचे मायावतींनी म्हटले आहे.
बसपा सुप्रिमोचा भाजपावरही हल्लाबोल
बसाच्या सुप्रिमो मायावतींनी समाजवादी पक्षासोबत भाजपावरही हल्लाबोल केला आहे. आमच्या योजनांची नक्कल केली जात आहे. धर्माच्या नावाने लोकांना फसवून राजकारण केले जात आहे. मोफत राशन देऊन लोकांना गुलाम केले जात असल्याचे मायावतींनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे. बेरोजगारी आणि महागाईवर सरकारचे लक्ष नाही. मायावतींनी लोकसभेच्या निवडणूकांच्या तयारीला लागण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.