Congress : देशभरात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार, तरुणांना अधिक संधी मिळणार! के. सी. वेणूगोपाल यांच्या पत्रात काय? वाचा…
जनमाणसांपर्यंत किंवा नव्या पिढीला काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका याची अधिक प्रभावीपणे ओखळ करून देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर वेणूगोपाल यांनी हे पत्र लिहिले आहे.
नवी दिल्ली : देशभरात काँग्रेसमध्ये (Congress) मोठे बदल होणार आहेत. काँग्रेस जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांनी महासचिव आणि प्रभारींना पत्र लिहिले (Wrote letter) आहे. देशभरात बूथ, ब्लॉक आणि जिल्हास्तरावर बदल केले जाणार आहेत. काँग्रेस समित्यांमध्ये पदाधिकारी निवडताना 50 टक्के पदे ही 50 वर्ष वयापेक्षा कमी लोकांना दिली जाणार आहेत. राज्यांमधील काँग्रेस प्रभारींनी 30 ऑगस्टपर्यंत यादी पाठवण्याच्या सूचना के. सी. वेणूगोपाल (K C Venugopal) यांनी केल्या आहेत. काँग्रेस पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या हेतूने हे फेरबदल करण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे आणि तळापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी काळात पक्षाला याचा फायदा होण्याचा अंदाज आहे.
ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोहोचावी, हा उद्देश
काँग्रेस पक्षाला एक मरगळ आल्याची टीका सातत्याने होत आहे. तळापर्यंत काँग्रेसचे कार्यक्रम, काँग्रेसची भूमिका त्यामुळे पोहोचत नाही. पक्षात अलिकडील काळात केवळ ज्येष्ठांची संख्याच अधिक आहे. विशेषत: 50 वर्षांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र तरुणांची संख्या अपेक्षेनुसार नाही. त्यामुळे जनमाणसांपर्यंत किंवा नव्या पिढीला काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका याची अधिक प्रभावीपणे ओखळ करून देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर वेणूगोपाल यांनी हे पत्र लिहिले आहे.
के. सी. वेणूगोपाल यांचे पत्र
विविध स्तरावर बदल
बूथ स्तर, ब्लॉक स्तर त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी लवकरात लवकर निवडावेत. त्याआधी 30 ऑगस्टपर्यंत यासंदर्भातील यादी पाठवावी. यादी तयार करताना पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे मांडणारी व्यक्ती निवडावी, ती 50 वर्षांपेक्षा कमी असावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. यादीतील किमान 50 टक्के नावे 50 वर्षांच्या आतील असावीत, असे या पत्रात म्हटले आहे. सध्या निवडणुकांचे वारे आहे. 2024मध्ये निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी स्थानिक पातळीवरही विविध निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबूत होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आता या निर्णयानंतर होणाऱ्या बदलाचा काँग्रेसला किती फायदा होतो, हे आगामी काळात दिसून येणार आहे.